बंधनांसह मार्केटयार्ड सुरू राहणार

नियमांची अंमलबजावणी : वीकेंड लॉकडाऊनही पाळणार

पुणे – शहरासह जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू आहे. पण, यामध्ये मार्केट यार्डातील बाजार सोमवार ते शुक्रवारदरम्यान सुरू असेल. फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी, फुले आणि पान विभाग पहाटे ते दुपारी एकपर्यंत सुरू असेल. तर गुळ-भुसार विभाग सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू असेल. शनिवार आणि रविवारी मात्र कडक लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असणार आहेत.

गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी दिवसाआड एक एक विभाग सुरू ठेवण्याचे नियोजन बाजार समितीकडून करण्यात आले होते. मात्र, वीकेन्ड लॉकडाऊन असल्याने सोमवार ते शुक्रवार ठरलेल्या वेळेत सलग दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला दी पूना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, वालचंद संचेती, अशोक लोढा, प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठिया, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, बापू भोसले, युवराज काची, राजेंद्र कोरपे, अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर, फुलव्यापारी प्रकाश काळे, तात्या शेलार यावेळी उपस्थित होते.

ग्राहकांची गर्दी होत आहे. ती थोपवण्यासाठी किरकोळ खरेदीदारांना बाजारात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच एक नंबर गेटने माल घेऊन येणाऱ्या वाहनांना प्रवेश, तर दुसऱ्या गेटने बाहेर पडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी विभागानुसार कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.