खरेदीसाठी वाट्टेल ते..! मार्केट यार्डसह सर्वच बाजारपेठा फुल

नियम पायदळी

पुणे – पुण्यासह राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. यामुळे नागरिकांनी बुधवारी सकाळपासून मार्केट यार्डमध्ये फळ, भाजीपाला आणि भुसार बाजारात किराणा खरेदीसाठी गर्दी केली होती, तर शहरातील विविध पेठा, उपनगरांतही जवळपास सर्वच पुणेकर जणू बाजारात आले की काय, असेच दृश्‍य होते. त्यामुळे करोना प्रतिबंधक नियम आपोआपच पायदळी तुडवले गेले.

आजपासून पुढील 16 दिवस संचारबंदी असल्यामुळे नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही, या धास्तीने ग्राहकांनी सकाळपासूनच मार्केट यार्डातील फळे व भाजीपाला विभागात गर्दी केली. शिवाय वाहतूक कोंडीही झाल्याचे दिसून आले.

फळे, भाजीपाला विभाग भल्या पहाटे सुरू होतो, तर भुसार विभागातील दुकाने सकाळी 10 वाजता सुरू होतात. त्यामुळे 10 वाजल्यापासून भुसार बाजारात गर्दी असते. दिवसभर मार्केट यार्डात गर्दीचे चित्र पाहायला मिळाले. अनेक दुकानांमध्ये करोना नियमांचा फज्जा उडाल्याचेही चित्र होते. मार्केट यार्डातील भुसार बाजारात किरकोळ ग्राहकांनी गर्दी केली होती.

चहाची दुकाने बिनबोभाट
चहाच्या दुकानांबाहेरही नागरिकांनी तुडुंब गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाच उडवला. पाच वाजेपर्यंत चहाची दुकाने सुरूच होती.

उपनगरांत नियमांचा विसर
उपनगरांमध्ये तर आबादी आबादच होते. लॉकडाऊन, जमावबंदी आजही सुरूच आहे, याचा नागरिकांना विसरच पडला होता. जी दुकाने सुरू करायची नव्हती ती सगळी दुकाने दिवसभर उघडी ठेवण्यात आली होती. त्यामुळेही उपनगरात गर्दी होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.