विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीचाही “बाजार’?

बाह्य एजन्सीला माहिती देऊ नये : शिक्षण विभागाला आदेश

  • ऑनइलाइन शिक्षणासाठी “दीक्षा ऍप’चा वापर करा

पुणे  – राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती बाह्य एजन्सीला देऊ नये, असे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालकांनी राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, महापालिकांचे प्रशासन अधिकारी यांना दिले आहेत.

 

करोना परिस्थितीमुळे शिक्षण क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. मार्चपासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. शासनाने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबला आहे. काही शाळा महागड्या अशा शैक्षणिक ऍपचा वापर ऑनलाइन शिक्षणासाठी करीत आहेत. यासाठी पालकांकडून विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती मागवून घेण्यात येत आहे. ही प्राप्त माहिती संबंधित शाळेकडून बाह्य एजन्सी म्हणजेच खासगी संस्था, कोचिंग संस्था, महाविद्यालये यांना पुरवली जात असल्याच्या तक्रारी शासनास व केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांना देखील प्राप्त झाल्या आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. यावर शासनाने योग्य ती कारवाई करण्याविषयी शासनस्तरावरुन सूचना देण्यात आल्या होत्या.

 

राष्ट्रीय स्तरावरुन “वन नेशन वन प्लॅटफॉर्म’अंतर्गत “दीक्षा ऍप’चा वापर करण्याविषयी सूचित करण्यात आले आहे. हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे मोफत असून विद्यार्थ्यांना आवश्यक असे सर्व शैक्षणिक साहित्य येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विद्यार्थी हिताचा विचार करता “दीक्षा ऍप’चा वापर संपूर्ण राज्यात होणे अपेक्षित आहे.

 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद हे शैक्षणिक प्राधिकरण असल्याने परिषदेमार्फत मान्यता देण्यात आलेल्या शैक्षणिक शैक्षणिक ऍप किंवा शैक्षणिक साहित्य केवळ वापरण्यात यावे. मान्यतेशिवाय वैयक्तिक हितासाठी असे कोणतेही साहित्य वापरण्यात किंवा प्रसारित करण्यात येऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.