पुण्यात सहा हजार बेड, तरीही “हेळसांड’ !

  •  महापालिकेच्या विशेश तपासणीत समोर आली बाब
  • खासगी रुग्णालयांनी नाकारले इतर आजारांचे रुग्ण

पुणे – शहरात करोना साथीने उच्चांक गाठलेला होता. त्यावेळी बाधितांवर उपचारांसाठी महापालिकेने 81 खासगी रुग्णालयांचे सुमारे 5 हजार 179 बेड ताब्यात घेतले होते. त्याच वेळी नॉन कोविड रुग्णांसाठी इतर खासगी रुग्णालयांत तब्बल 5 हजार 923 बेड शिल्लक होते. मात्र, त्यानंतरही अनेक रुग्णालयांनी इतर आजारांच्या रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांची हेळसांड केल्याचे समोर आले आहे. या प्रकारांबाबत तक्रारी आल्याने पालिकेने गेल्या तीन ते चार महिन्यांतील रुग्णालयांच्या बेडची माहिती संकलित केली. त्यातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

 

शहरात मार्चपासून करोनाचे रुग्ण सापडणे सुरू झाले. सुरुवातीच्या दोन महिन्यांत लॉकडाऊनमुळे बाधितांची संख्या मर्यादित होती. मात्र, मेपासून ही नव्या बाधितांची संख्या वेगाने वाढू लागली. यामुळे शासकीय रुग्णालयांत उपचारांसाठी मर्यादित जागा होती. त्यामुळे राज्य शासनाने खासगी रुग्णालयांचे बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला.

 

त्या अंतर्गत शासनाने 80 टक्के बेड्स ताब्यात घेण्याचा आदेश काढला. महापालिकेने शहरातील खासगी हॉस्पिटल्सच्या बेड्सची माहिती काढली असता, शहरात 711 खासगी रूग्णालयांचे सुमारे 15 हजार 867 बेड उपलब्ध होते. त्यातील महापालिकेने सुमारे 10 हजार 668 बेड कोविडसाठी नियंत्रित केले होते. तर प्रत्यक्षात 5 हजार 179 बेड्सच ताब्यात घेतले होते. त्यामुळे उर्वरित बेड्स खासगी हॉस्पिटल्सकडेच होते. तर 711 मधील केवळ 84 हॉस्पिटल्समध्ये कोविड बाधित असल्याने उर्वरित तब्बल 627 हॉस्पिटल्स नॉन कोवीड रुग्णांसाठी उपलब्ध होती.

 

पालिकेचे आदेश डावलले

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने गेल्या आठ महिन्यांत केवळ 5 हजार 993 बेड ताब्यात घेतले होते, तर उर्वरित सुमारे 5 हजार 923 बेड नॉन कोविड रुग्णांसाठी शिल्लक होते. मात्र, त्यानंतरही कोविडच्या भीतीने अनेक हॉस्पिटल्सने बेड नसल्याचे कारण देत नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला. त्याबाबत केंद्रशासन, जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासनाकडे तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर महापालिकेनेही आदेश काढत “नॉन कोविड रुग्णांवर उपचार नाकारू नयेत’ असे आदेश दिले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.