पूजा सामग्री, फुलांना मागणी वाढली : तुळशी विवाहानंतर दिवाळीची होणार सांगता
पिंपरी (प्रतिनिधी) – शनिवारपासून तुळशी विवाहास प्रारंभ झाला. त्यामुळे, शनिवारी दिवसभर तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या पूजा साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी झाली होती. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने बहुतेकांनी या दोन दिवसांमध्ये तुळशी विवाह उरकून घेण्याची तयारी सकाळपासूनच सुरु केली होती. ठिकठिकाणी महिला वर्ग तुळशी वृंदावन सजविण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत होते.
आरोग्य आणि सुखशांतीचे प्रतीक असलेल्या तुळशीचा विवाह सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. तुळशी विवाहनिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी झालेली पहायला मिळाली. बाजारात मोठ्या प्रमाणात लहान-मोठ्या झेंडूच्या फुलांची आवक झाली होती. आवळा, चिंच, मनी-मंगळसूत्र, हळदीचे कापड, हिरव्या बांगड्या, ऊस असे पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी दिवसभर गर्दी केल्याचे चित्र होते.
पूजेसाठी लागणाऱ्या चिंच, आवळा व चूडा आदी वस्तुंची पुडी 10 ते 15 रुपये, तुळशी वाट्याची किंमत 20 ते 30 रुपये, तर झेंडूची फुले 80 ते 120 रुपये किलो होती. 5 ऊसाची मोळी 50 ते 60रुपये, तर एक ऊस 10 ते 15 रुपयांना विक्री होत होता. पिंपरी मार्केट परिसरात या साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. आजपासून सुरु झालेले तुळशी विवाह त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत सुरु राहणार आहेत.
तुळशी विवाह सोहळा संपल्यानंतर यंदाच्या लग्नसराईला सुरुवात होणार आहे. त्यामुळे, दिवाळीमधील शेवटचा सण म्हणून तुळशी विवाहाकडे पाहिले जाते. आजपासून सुरु होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रत्येक जण उत्साही असल्याचे पहायला मिळाले.
घराघरातील तुळशी वृंदावन सजले
तुळशी विवाहाच्या पार्श्वभूमीवर घराघरातील तुळशी वृंदावनाची साफसफाई व रंगरंगोटी करण्यात आली. अनेकांनी बाजारातील तयार मातीच्या व प्लॅस्टिकच्या कुंड्या आणून सजावट केली होती. संध्याकाळी घरोघरी हा विवाहसोहळा मोठ्या थाटात साजरा झाला.