पुणे {प्रभात वृत्तसेवा}- रात्रीच्या वेळेत वातानुकूलित डब्यात शिरून रेल्वे प्रवासी महिलेकडील दागिने चोरणाऱ्या चोरट्याला लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली.
विशाल विठ्ठल नागटिळक (३०, रा. लोणकर वस्ती, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत बलविंदरसिंह मारवा (४४, रा. सुंदर काॅलनी, अहमदाबाद) यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हाेती. मारवा कुटुंबीय चेन्नई एक्स्प्रेसने प्रवास करत होते. त्या वेळी त्यांच्या पत्नीच्या पर्समधून आठ लाख ७७ हजार ७०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले होते.
पुणे रेल्वे स्थानक परिसरात पत्नीच्या पर्समधील दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील ५२ ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. चित्रीकरणात दोन संशयित आढळून आले.
चोरलेले दागिने विक्रीसाठी नागटिळक अजमेर एक्स्प्रेसमधून मुंबईकडे निघाल्याची महिती लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आठ लाख ७७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली. पोलिसांनी मारवा यांच्या पत्नीला दागिने परत केले. मारवा दाम्पत्याने लोहमार्ग पोलिसांचे मनोमन आभार मानले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, उपनिरीक्षक स्वप्नील वाघमारे, पोलीस हवालदार अमरदीप साळुंके, इम्तियाज अवटी, जावेद शेख, फिरोज शेख यांनी ही कामगिरी केली.