पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून वाहतूक नियोजनावर आधारित पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अभ्यासक्रमामुळे वाहतूक नियोजनावर सखोल अभ्यास होण्याची अपेक्षा आहे.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुनील भिरूड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनवणे आणि प्रशासकीय मंडळाचे सल्लागार डॉ. रवींद्र उटगीकर उपस्थित होते.
डॉ. चौधरी म्हणाले, सीओईपी विद्यापीठाकडून उद्योग क्षेत्राशी निगडित अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पारंपारिक ज्ञानासोबत थेट कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेता यावा, यासाठी हे अभ्यासक्रम फायदेशीर ठरतील. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना विद्यापीठाने सार्वजनिक धोरण क्षेत्रात सकारात्मक वाटचाल करीत आहे. अभियंत्यांना सार्वजनिक धोरणाबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने सीओईपी विद्यापीठ व फ्लेम विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.
सीओईपीतर्फे रीसर्च पार्क प्रस्तावित
आयआयटी मद्रास येथील रिसर्च पार्कच्या धर्तीवर चिखली येथे रिसर्च पार्क प्रस्तावित असून यासाठी राज्य सरकारकडून ४० कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. आयआयटी मद्रासच्या रिसर्च पार्कचा अभ्यास करून नवे रिसर्च पार्क विकसित केले जाणार आहे. या रिसर्च पार्कसाठी आवश्यक आर्थिक बाबींसाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू असून सरकारही सकारात्मक असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राचे धडे
सामंजस्य करारानुसार गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे प्राध्यापक सीओईपीमध्ये अभियांत्रिकी अर्थशास्त्राचे वर्ग घेत असून यासाठी तृतीय वर्षाच्या अभियांत्रिकी वर्गातील तब्बल १७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये कॉम्प्युटर-८२, इलेक्ट्रीक-३१, इलेक्ट्रॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन- ४८ आणि इंन्स्ट्रूमेंटेशन व कंट्रोल इंजिनिअरिंगच्या १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. सुनील भिरूड यांनी दिली.