पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- शरद मोहोळची पत्नी स्वाती यांना धमकी देणारा आरोपी सायबर पोलिसांच्या ताब्यातून ससून रुग्णालयातून पसार झाला. या प्रकरणी हलगर्जी केल्यामुळे सायबर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
पोलीस शिपाई निखील अरविंद पासलकर आणि पोपट काळुसिंग खाडे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी निलंबणाचे आदेश काढले आहेत.
मार्शल लुईस लिलाकर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. धमकी दिल्याप्रकरणी स्वाती हिने पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानसार आकुर्डी येथील मार्शल याला अटक करण्यात आली. त्याने मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने इन्स्टा खाते उघडून धमकी दिली होती. दरम्यान, शुक्रवारी ताब्यात घेण्यात आल्यावर त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
रविवारी रात्री छातीत दुखत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याला ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. नाइट राऊंडचे पोलीस निरीक्षक खोमणे यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात सोडून त्यांना योग्य ती काळजी घेत तपासणीसाठी आरोपीला नेण्यास सांगितले होते. दरम्यान, दोन्ही कर्मचाऱ्यांची नजर चुकवून आरोपी पळून गेला.
आरोपी आकुर्डी परिसरात येऊन गेला-
पळून गेलेला आरोपी सोमवारी आकुर्डी परिसरात येऊन गेला. मात्र, तो स्वत:च्या घरी न येता मित्राच्या घरी गेला. त्याने मित्राच्या वडिलांकडे पैसे मागितले. मात्र, त्यांच्या खिशात फक्त १३० रुपये होते. हे पैसे घेऊन तो निघून गेला. एका ठिकाणी तो सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. मात्र, त्यानंतर तो मुख्य रस्त्याने न जाता गल्लीबोळातून फिरत असल्याने तसेच त्याच्याजवळ मोबाइल नसल्याने माग काढणे अवघड जात आहे.