- कासारवाडी येथील घटना; आरोपी प्रियकर ताब्यात
पिंपरी – पतीपासून वेगळे पण प्रियकरासोबत “लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या विवाहितेचा प्रियकराने गळा आवळून खून केला. ही घटना कासारवाडी येथे मंगळवारी (दि. 19) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेत प्रियकराने बावीस वर्षीय विवाहितेचा खून केला. या प्रकरणी तिचा प्रियकर महेश मल्हारी खंडागळे (वय 28, दोघेही रा. भीमराव जवळकर चाळ, कासारवाडी) याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. मयत विवाहितेच्या आईने बुधवारी (दि. 20) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हिचा विवाह झाला असून सध्या ती पतीपासून वेगळी राहत आहे. त्यानंतर मयत आणि आरोपी महेश यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते व ते दोघे लग्नही करणार होते. त्यांच्या या विवाहास मयत यांची आई आणि त्यांचा मुलगा यांचीही संमती होती. गेल्या काही दिवसांपासून आरोपी महेश हा मयत यांना लग्न करण्यासाठी आग्रह करीत होता. मात्र ती लग्नास तयार नसल्याने तो मयत यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून मयत आणि महेश यांच्यात मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी महेश याने गळा आवळून विवाहितेचा खून केला.
खून केल्यानंतर विवाहितेने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांना त्याच्या हालचालीबाबत शंका आल्याने त्याच्यावर प्रश्नांची सरबती केली. त्यामध्ये त्याने आपण विवाहितेचा खून केल्याची कबुली दिली. गेल्या तीन दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत खूनाची ही चौथी घटना आहे.