हरवलेले मूल सोशल मीडियामुळे पाच तासांत आईच्या कुशीत

सणसवाडी येथील प्रकार : शिक्रापूर पोलीस, पत्रकांराची तत्परता

शिक्रापूर- सोशल मीडियाचा वापर जितका चांगला तितका वाईट असल्याचे बोलले जात असते. परंतु सोशल मीडियामुळे गैरप्रकार होत असताना सणसवाडी (ता. शिरूर) येथे बेदरलेल्या अवस्थेतील चार वर्षाचा आयुष हा मुलगा सोशल मीडिया व शिक्रापूर पोलीस तसेच पत्रकारांच्या मदतीने पाच तासांत आईच्या कुशीत विसावला आहे. सणसवाडी येथील एका कंपनीजवळ सकाळी नऊच्या सुमारास एक चार वर्षाचा लहान बालक बेदरलेल्या अवस्थेत होता. त्यावेळी सणसवाडी येथील रामदास हरगुडे यांना रडणाऱ्या त्या बालकाची कीव आली. त्यांनी त्याला जवळ घेत विचारपूस केली. परंतु त्याला काही समजत नसल्याने बोलत नव्हता. त्यानंतर हरगुडे यांनी त्याला ग्रामपंचायत कार्यालयात सोडले. त्यावेळी पोलीस पाटील दत्तात्रय माने यांना माहिती दिली. पोलीस पाटील यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आणले.

त्यांनतर पोलिसांनी सणसवाडीत अनेक ठिकाणी चौकशी केली. परंतु या बालकाबाबत काहीही माहिती मिळत नसल्याने अखेर पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर, पोलीस नाईक तेजस रासकर, संतोष पवार, पत्रकार शेरखान शेख यांनी बालकाचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून शिक्रापूर व सणसवाडी परिसरातील सर्व नागरिकांना पुढे पाठविण्याचे आवाहन केले. त्यांनतर दुपारी अडीचच्या सुमारास फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर सणसवाडी येथील जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलमधून पोलिसांना फोन आला. हा मुलगा आमच्या शाळेतील असल्याचे सांगितले. मुलाची आई कोमल पाखरे, काही शिक्षक पोलीस स्टेशन येथे आले. आयुषच्या आईने आयुषला पाहताच जीव भांड्यात पडला. शिक्रापूर पोलीस व पत्रकारांनी केलेल्या कार्याचे जिजामाता स्कूलच्या शिक्षकांनी आभार मानले. यावेळी मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. आयुषला शोधून देणाऱ्या सर्व व्यक्‍ती आम्हाला देवासारखे भेटले, असे आयुषच्या आईने सांगितले.

  • दोन वर्षांत चार मुले पालकांकडे
    शिक्रापूर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस नाईक विजय गाले यांनी यापूर्वी कोरेगाव भीमा येथे आलेली तीन वर्षाची मुलगी, 2018 मध्ये सणसवाडी येथे आजोबांच्या मागे गेल्यानंतर चुकलेला अडीच वर्षाचा मुलगा, काही दिवसांपूर्वी शिक्रापूर येथे चुकलेला चार वर्षाचा महेश याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आई वडिलांचा शोध घेत त्याला त्याच्या आई, वडिलांच्या ताब्यात दिले आहे. आज पुन्हा एक चार वर्षाच्या मुलाला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोन वर्षांत हरविलेली चार मुले पालकांच्या ताब्यात देण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here