‘कूलिंग’ चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची लूट

प्रवासी व वाठार स्टेशन ग्रामस्थांकडून नाराजीचा सूर

वाठार स्टेशन: सध्या कडक उन्हाळा सुरू असल्याने शीतपेयांना मागणी वाढली आहे. तथापि, अनेक विक्रेते कुलींग चार्जेसच्या नावाखाली ज्यादा पैसा वसूल करत असल्याने ग्राहकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

वाठार स्टेशन हे उत्तर कोरेगाव मधील बाजारपेठेचे प्रमुख केंद्रबिंदू असल्यामुळे याठिकाणी पंचक्रोशीतील लोकांचा वावर असतो. येथे ब्रिटिशकालीन रेल्वे स्टेशन आहे. राष्ट्रीयीकृत बॅंका, महावितरणचे सब डिव्हिजन ऑफिस, हायस्कूल, महाविद्यालय, पोस्ट ऑफिस, टेलिफोन एक्‍सचेंज, फॉरेस्ट ऑफिस तसेच विविध प्रकारच्या पतसंस्था आहेत. या सर्व प्रकारच्या सुखसोयींमुळे याठिकाणी लोकांचा राबता असतो. लांब पल्ल्याच्या रेल्वे, एसटीसुद्धा वाठार स्टेशनमधून जातात. वाठार स्टेशन मधून हजारोच्या संख्येने रोजच्या रोज प्रवासी येतात जातात. तसेच महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी परदेशी पर्यटकांना तसेच पुणे, मुंबई येथील पर्यटकांना वाठार स्टेशन हे जवळचे रेल्वेचे स्टेशन असल्यामुळे सर्व हौशे-नवशे-गवशे पर्यटक वाठार स्टेशन येथेच उतरून पुढील प्रवासासाठी महाबळेश्वर येथे जातात. यामुळेच वाठार स्टेशन येथील बाजारपेठ, दुकानदारी, कोल्ड्रिंक्‍स दुकाने, आईस्क्रीम पार्लर जोरात चालतात.

सध्या उन्हाळ्याची तीव्रता जास्त असल्यामुळे प्रवाशांना सहाजिकच कोल्ड्रिंक्‍स, उसाच्या रसाची गुऱ्हाळे, शीतपेये, थंडगार बर्फावर ठेवलेली कलिंगडची डिश, बिसलेरी पाणी, थंडा थंडा कुल कुल एक्वाच्या पाण्याकडे आकर्षित व्हावे लागते. कडक उन्हामुळे लोकांना भूक कमी पण तहान जास्त लागते. घशाला कोरड पडल्यामुळे प्रवाशांचे पाय आपोआप कोल्ड्रिंक दुकानाकडे वळतात. मग काय दुकानदार कूलिंग चार्जेस च्या नावाखाली स्थानिक जनतेची व प्रवाशांची राजरोसपणे लूट करत असतो. दुकानदारांची मनमानी चालत असते.

बिसलेरीचा भाव 20 रुपये बाटली, कोल्ड्रिंगच्या बाटलीच्या भावात सुद्धा किमतीपेक्षा जास्त तफावत असते. तसेच वाठार स्टेशन परिसरात कूलिंग जार वाल्यांचाही सुळसुळाट झाला आहे. वाठार स्टेशन व परिसरात पिण्याच्या पाण्याची कायम बोंब असते. त्यामुळे स्थानिक व्यापारी, ग्रामस्थ, मध्यमवर्गीय सुद्धा थंड केलेले जारचे पाणी पितात. तसेच सध्या लग्नसराईचा सिझन जोरदार धुमधडाक्‍यात सुरू असल्यामुळे थंडगार जारची मागणी वाढली आहे. त्यामुळे थंडा थंडा कुल कुल वाल्यांनी जारच्या किमती दुपटीने वाढलेल्या आहेत. म्हणजेच 30 रुपयांचा जार 40 रुपयास राजरोसपणे विकला जात आहे. त्यामुळे दिवाळी नसताना सुद्धा उन्हाळ्यात कूलिंग वाल्याची दिवाळी साजरी होत आहे. या वाढलेल्या किमतीमुळे प्रवासी जनतेच्या व ग्रामस्थांच्या खिशाला चाट बसत आहे. तरी संबंधित प्रशासनाने कूलिंगच्या नावाखाली जनतेची लूट करणाऱ्या दुकानदारावर व थंडा थंडा कुल कुल जारवाल्यांवर वेळीच आवर घातला पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थ, प्रवासी वर्गातून, मध्यमवर्गीय व गोर गरीब जनतेकडून होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.