पिंपरी,(प्रतिनिधी) -इयत्ता दहावीतील मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी रावेत येथील क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल या शाळेचा शैक्षणिक परवाना त्वरीत रद्द करण्याची शिफारस पत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांबळे पाटील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. त्याचबरोबर, शाळेची मान्यता व ना हरकत पत्र ही रद्द करण्यात यावे, अशी देखील शिफारस त्यांनी पुणे शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली आहे.
विद्यार्थी लैंगिक अत्याचार प्रकरणी क्रिएटिव्ह पब्लिक स्कूलचा संस्थाचालक नौशाद शेख (वय ५७, रावेत कार्नर, रावेत) याला पोलिसांनी अटक केली आहे. या गंभीर प्रकाराच्या संपूर्ण चौकशीअंती शाळेचा दाखला बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेपूर्वी देखील शाळा संस्थाचालकाने मुलींचा अत्याचार केल्याचे धाक्कादायक प्रकार निदर्शनास आले आहेत. या गंभीर प्रकरणाची पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने दाखल घेतली असून संस्थेचे परवाने रद्द करण्याची शिफारस संबंधित विभागांकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांबळे पाटील यांनी क्रिएटिव्ह पब्लिक स्कूलचा परवाना त्वरीत रद्द करण्याची शिफारस पुण्यातील धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त जांबळे पाटील यांनी शाळेची मान्यता व ना हरकत पत्र ही रद्द करण्यात यावे, अशी शिफारस पुणे शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली आहे.