पारनेर, (प्रतिनिधी) – तालुक्यातील वासुंदा येथील भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक संस्थेबाबत पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना बेकायदेशीर नोकर भरतीला तातडीने स्थगिती द्यावी, अशी लेखी मागणी निवेदनाद्वारे संस्थेचे संस्थापक संचालक भागुजी झावरे, संस्थापक सचिव सदाशिव तनपुरे, धोंडीभाऊ आहेर, पोपट साळुंके, शरद झावरे यांनी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्याकडे केली आहे.
दुसरीकडे भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थेची शिक्षण विभागाच्या माध्यमातून चौकशी सुरू असून ,ही भरती प्रक्रिया तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी भेट घेऊन करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, या शिक्षण संस्थेच्या शिक्षक भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक संस्थेची आपल्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून सध्या चौकशी चालू असून या संदर्भात धर्मदाय उपायुक्त, नगर व धर्मदाय आयुक्त, पुणे यांच्याकडे न्यायालयीन वाद प्रलंबित आहे.
यासंदर्भात या शिक्षण संस्थेवरील संचालक मंडळाच्या बाबतीत कोणताही बदल अर्ज अधिकृतपणे धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडून मंजूर करण्यात आलेला नाही. तरीपण अध्यक्ष सुजित झावरे व सचिव सुदेश झावरे यांनी शिक्षक भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करून एक प्रकारे न्यायालयाचा व शिक्षण विभागाचा अवमान केला आहे. त्यामुळे ही शिक्षक भरती तातडीने स्थगित करावी, अशी मागणी आम्ही लेखी निवेदनाद्वारे करत आहोत. या निवेदनावर भागुजी झावरे, सदाशिव तनपुरे, धोंडीभाऊ आहेर, बबनराव गांगड, पोपट साळुंके, शरद झावरे यांच्या सह्या आहेत.