कोयना धरणातील पाणीसाठ्याचे अर्धशतक

पाणीसाठा पोहोचला 50.04 टीएमसीवर; पाण्याची आवक 17 हजार 555 क्युसेक

– सूर्यकांत पाटणकर

पाटण(प्रतिनिधी) – विजेची व सिंचनाची गरज भागविणार्‍या कोयना धरणाने जुलैच्या मध्यावर पाणीसाठ्याचा अर्धशतकाचा टप्पा ओलांडला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावल्याने यावर्षी संथगतीने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. मात्र, गत वर्षी कोयना पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने तसेच सिंचन व वीज निर्मितीसाठी आवश्यक पाणी वापरूनही धरणात 30 टी एम सी पेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक असल्याने यावर्षी कोयना धरणाने जुलैच्या मध्यावर हाफ सेंचुरी मारली आहे. पावसाचा मुख्य कालावधी शिल्लक असल्याने कोयना धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरेल असा विश्वास कोयना धरण व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

सध्या धरणात 50.04 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असला तरी अधूनमधून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे धरणात 17 हजार 555 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. तर गतवर्षी आजच्या दिवशी कोयना धरणात 4 हजार 413 क्‍युसेक पाणी प्रतिसेकंद येत होते. 105. 25 टीएमसी साठवण क्षमता असणार्‍या कोयना धरणाचा पाणीसाठा संथ गतीने वाढत आहे. कृष्णा लवादानुसार धरणातील 69 टीएमसी पाणीसाठा पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी वापरला जातो तर 29 टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचनासाठी वापरला जातो तर उर्वरित पाणीसाठा मृत पाणीसाठा म्हणून घोषित करण्यात येतो.

पूर्वेकडील सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करून विद्युतगृहातून पाणी सोडले जाते. पश्चिमेकडील पाण्यावर वीजनिर्मिती करून हे पाणी समुद्रात सोडले जाते. मात्र, अद्यापही या पाण्याचा वापर पूर्ण क्षमतेने पश्चिमेकडील शेती व औद्योगिक विकास करण्यासाठी होणे गरजेचे आहे. मात्र यासाठी शासनाने सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना जलविद्युत प्रकल्पाची पाहणी केली होती. त्यामुळे वीज निर्मिती करून सोडण्यात येणारे पाणी मुंबईच्या दिशेने वळवण्यावर चर्चा झाली होती. मात्र, अद्यापही यावर सकारात्मक दृष्टीने प्रयत्न झाले नाहीत.

पावसाचे मुख्य महिने असणारे जुलै- ऑगस्ट यापैकी जुलै महिना संपत आला असून ऑगस्ट व सप्टेंबर महिना अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे या दोन महिन्यांत धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा कयास आहे. 15 ऑगस्टपूर्वी कोयना धरण भरण्याची डेडलाईन असते. जून ते पंधरा ऑगस्ट दरम्यान कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस हजेरी लावतो. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढते.

पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्याचा विचार….

कोयना धरणातील पश्चिमेकडील पाणी वीज निर्मितीसाठी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र, वीज निर्मितीनंतर हे पाणी समुद्राला मिळते. त्यामुळे या पाण्याचा उपयोग होणे गरजेचे आहे त्यासाठी पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी सध्या अभ्यास चालू आहे. त्यासाठी प्रस्ताव देखील सुरू आहेत. लवकरच त्यावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तर 2019 मध्ये पूर परिस्थितीमुळे कोयना धरणाची जलाशय चलन परी सूची बदलण्यात आली आहे त्याला मुख्य अभियंत्यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार सध्या कोयना धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. दर पंधरा दिवसांनी पाणी पातळी निश्चित केली जाते. निर्धारित पाणी पातळीच्या वर पाणी गेल्यास ते धरणातून सोडून द्यावे लागते. त्यामुळे यावर्षी कोयना धरण व्यवस्थापनाने पूर परिस्थितीचे काटेकोर नियोजन केले आहे.
– नितेश पोतदार (कार्यकारी अभियंता कोयना सिंचन मंडळ.)

मागील वर्षी कोयना धरणातून तीन ऑगस्ट रोजी धरणाचे 6 वक्र दरवाजे व पायथा वीज ग्रहातून 13 हजार 527 कयुसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी धरणातील पाणीसाठा 88.89 टीएमसी होता.

सध्या कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. आज रोजी कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 17 हजार 555 क्युसेक प्रतिसेकंद आहे तर आज पर्यंत कोयना पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस कोयना 1 हजार 263 मिलिमीटर नवजा 1 हजार 726 मिलिमीटर तर महाबळेश्वर या ठिकाणी 1 हजार 763 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.