लोणीकंद, (वार्ताहर) – फळांचा राजा म्हटलं की डोळ्यासमोर येतो हापूस आंबा. हाच हापूस आंबा आता बाजारात दाखल झालाय. पिकलेला आंबा बाजारात येताच त्याच्या घमघमाटाने तोंडाला पाणी सुटते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हापूस लवकरच बाजारात दाखल झाला आहे.
उन्हाळा सुरू झाला की कोकणचा राजा देवगड हापूस आंब्याला फळ बाजारात मागणी वाढत असते. यंदा बाजारात लवकर आंबे दाखल झाले असले तरी भाव मात्र कमी नाहीत. आंब्याचा भाव जरी चढा असला तरी मागणी देखील मोठ्या प्रमाणावर आहे.
बाजारात हापूस मुबलक प्रमाणात जरी उपलब्ध होत असला तरीही ग्रामीण भागातील खवय्यांकडून आंब्याला जास्त मागणी असल्याचे पाहायला मिळते. देवगड, कट्टा, कुणकेश्वर सह कोकणातून आंब्यांची रोज आवक होत असून खवय्ये सद्ध्या आपल्या अवडीसाठी कितीही पैसे मोजायला तयार असल्याचे पाहायला मिळते.
1200 ते 1500 डझन
सध्या आंबा थोडा महाग जरी असला तरी आंब्याचे चाहते कितीही पैसे मोजून खाण्यासाठी घेऊन जाण्यास तयार आहेत. सध्यातरी एक डझन आंब्याचा भाव 1200 ते 1500 रुपये असून 4 ते 7 डझन आंब्यांची पेटीला 4 ते 7 हजार रुपये मोजावे लागत आहे.
पाडव्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता
लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारे फळ हापूस आंबा असल्याने अनेकजण उन्हाळ्यात आंबे खाण्यास पसंती देतात; मात्र भाव कमी झाल्यानंतर सामान्य नागरिक खाण्यास पसंती देत असले तरी बाजारात आल्या आल्या पहिला आंबा आम्ही खाणारच अशीही मंडळी पाहायला मिळत आहे.
एकंदरीत मार्चमध्ये जरी आंब्यांचे भाव जास्तीचे असले तरी गुढी पाडव्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता असल्याचे यावेळी देवगडचे उत्पादक शेतकरी प्रणव पाटील व ओमकार गावकर यांनी सांगितले.