पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राजा श्री शिवराय प्रतिष्ठान संचालित मातोश्री वृद्धाश्रम कर्वेनगर येथे बालसदन आणि ज्येष्ठ नागरिक सदन नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन पी.आर.जी.एक्स इंडिया प्रा. लि. कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या निदेशिका छवि सिन्हा आणि शशिकांत सुतार यांच्या हस्ते झाले. प्रा.लि. आणि रोटरी क्लब चॅरिटेबल ट्रस्ट, कोथरूड यांच्या सहकार्याने इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले.
आम्हाला वृद्धांची सेवा करण्याची संधी मिळाली. अशा प्रकारची मानवतेची सेवा आमच्याकडून झाली हे आमचे भाग्य, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कंपनीचे प्रशासकीय प्रमुख हिमांशू खोले यांनी आजी आजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना वृद्धाश्रमाऐवजी याला आपण ज्येष्ठ नागरिक सदन म्हणणे योग्य राहील. त्याचबरोबर आपल्या संस्कृतीने हा वारसा घालून दिलेला आहे, तो पुढे घेऊन जाण्याचे कार्य आपणा सर्वांना करावे लागेल, असे ते म्हणाले.
रोटरी क्लबकडून अलका कुलकर्णी यांनी मत व्यक्त केले. एकटेपणा हा सर्वात मोठा आजार असून, तो दूर करण्याचे काम वृद्धाश्रम करत आहे, असे सुतार म्हणाले. या वेळी पी.आर.जी.एक्स. कंपनीचे वित्त विभागप्रमुख प्रथमेश बोरकर, रोटरी क्लबचे सदस्य वसंत कुलकर्णी, राजेश भाटे, आशुतोष दाबके, सुहास पटवर्धन, उज्ज्वल तावडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रमेश देवकुळे यांनी केले, तर आभार आणि सूत्रसंचालन शांताराम डफळ यांनी मानले.