मुंबई – जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचा घटना समोर आल्याने राज्यभरात एकच खळबळ माजली. हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनातही चांगलाच गाजला. यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी केली होती. परंतु, पोलिसांवरील आरोपात तथ्य नसल्याची माहिती देशमुख यांनी दिली असून याप्रकरणी क्लीन चीट दिली आहे. तसेच ज्या महिलेने तक्रार केली आहे, ती वेडसर असल्याची तक्रार याआधी समोर आल्याचे गृहमंत्री यांनी सांगितले.
काय म्हणाले अनिल देशमुख?
वसतिगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते. महिला अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन सर्व कामकाज पाहिले, महिलांशी चर्चा केली. महिलांचे वसतिगृह असल्याने आतमध्ये एकही पोलीस कर्मचारी जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये आतमध्ये आल्याची नोंदही नाही. त्यामुळे नग्न व्हायला लावले आणि पोलिसांनी व्हिडीओ काढला यामध्ये काहीही तथ्य नाही. तशा पद्धतीचा अहवाल महिला अधिकाऱ्यांने दिला आहे. तसेच, ज्या महिलेने तक्रार केली तिच्या पतीनेही याआधी त्या महिलेविरोधात तक्रार केली होती, असेही देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, तरुणींना कपडे काढून डान्स करायला लावले गेले. त्याचा व्हिडीओ बनवला गेला. या गंभीर प्रकाराबद्दल दोषींवर कारवाई झाली पाहिजे. गृहमंत्र्यांना विनंती आहे की, या पोलिसांचे निलंबन करावे, अशी मागणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी अधिवेशनात केली होती.