आधीच नाउमेद झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणखी मरगळ
पिंपरी – आगामी महापालिका निवडणुका अवघ्या 11 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत सपशेल हार पत्कराव्या लागलेल्या शहर कॉंग्रेसला संजीवनी देण्यासाठी नवीन शहराध्यक्षांची गरज आहे. शहराध्यक्ष सचिन साठे यांनी राजीनामा देऊन जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्यानंतरही पक्ष नेतृत्वाला शहराध्यक्ष पदासाठी नवा चेहरा सापडलेला नाही. गत महापालिका निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकल्याने या राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते आधीच हतोत्साहित झाले आहेत. त्यात पक्षश्रेष्ठींकडून शहराध्यक्षाची निवड देखील होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे.
2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने 65 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र, कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये पाणी प्रश्न, शास्ती कर व नागरिकांशी संबंधित विविध प्रश्नांवर कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलन केले. कॉंग्रेसचे अस्तित्त्व टिकवून ठेवले. मात्र, पक्ष संघटना आणि बांधणीसाठी आवश्यक असलेले नवे नेतृत्व देण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलेले नाही.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून गेल्या सहा वर्षांपासून अधिक काळ सचिन साठे हे काम पाहत आहेत. नव्या नेतृत्त्वाला संधी मिळावी म्हणून त्यांनी 11 नोव्हेंबर 2020 रोजी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ केला. मात्र, आता जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी पक्ष नेतृत्वाकडून नवीन शहराध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही.
त्यामुळे सचिन साठे हेच सध्या शहराध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत. स्थानिक पातळीवर कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी आणि आगामी महापालिका निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी कॉंग्रेसला नव्या दमाने काम करणारी कार्यकर्त्यांची फळी आणि उत्तम संघटन कौशल्य असलेल्या शहराध्यक्षाची गरज आहे.
नवीन चेहऱ्याला संधी मिळावी म्हणून कॉंग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा मी 11 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेला आहे. मात्र, अद्याप हा राजीनामा पक्ष नेतृत्वाने स्वीकारलेला नाही. कॉंग्रेसने नागरिकांच्या प्रश्नावर वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसाठी कॉंग्रेसला नव्या दमाने काम करावे लागणार आहे.
– सचिन साठे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस.
महापालिकेच्या आगामी निवडणुका 11 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. तत्पूर्वी, एका महिन्यात 3 पोटनिवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत नवीन शहराध्यक्षांबाबत त्वरीत निर्णय होणे गरजेचे आहे. जेणेकरून आगामी महापालिका निवडणुकांसाठी रचनात्मक काम करता येईल. तसेच, या निवडणुकांच्या माध्यमातून पक्षाला गतवैभव प्राप्त करून घेता येईल.
– नरेंद्र बनसोडे, शहराध्यक्ष, युवक कॉंग्रेस