पुणे – करोना बाधितांची संख्या जसजशी वाढत आहे, तशी चिंताही वाढत चालली आहे. सध्याच्या वाढलेल्या बाधितांमध्ये कुटुंबच्या कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण वाढले असून, त्याचे प्रमाण जवळपास 25 ते 30 टक्के इतके आहे.
येत्या काही दिवसांत बाधितांची संख्या दिवसाला 9 हजार होण्याची शक्यता जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने वर्तवली आहे. मागील वर्षीही शहरातील करोनाची परिस्थिती एवढी बिघडली नव्हती जेवढी आता आहे.
गेल्या काही दिवसांपर्यंत घरातील एक किंवा दोनच व्यक्ती बाधित होण्याचे प्रमाण होते. त्यांचे संस्थात्मक विलगीकरण केल्यानंतर कुटुंबातील अन्य सदस्यांचा संक्रमणापासून बचाव होत असे. परंतु आता गृहविलगीकरणात राहणाऱ्यांचे प्रमाण जास्त झाल्याने अख्खे कुटुंबच बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
कोविड केअर सेंटर बंद केल्यामुळे अनेकजण गृहविलगीकरणात राहिले. ज्यांच्याकडे घरात वेगळी सोय नव्हती त्यांनीही गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला. घरामध्ये सुरक्षेविषयीची काळजी न घेतली गेल्याने विषाणू वेगाने पसरला. कमी लक्षणे असणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत जास्त होते.
घरामध्ये अनेक गोष्टी “कॉमन’ असतात, ज्या सगळेच हाताळत असतात. घरातील एखादा सदस्य जरी करोना संक्रमित होऊन घरात आला तर या वापरातील वस्तूवरून तो सगळीकडे पसरतो. असाच प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये झाला आहे.
गृहविलगीकरणात मुख्यत्त्वे काय टाळावे
बाधित व्यक्तींना पूर्णपणे विलगीकरणात ठेवावे.
बाधिताच्या वस्तू वेगळ्या ठेवणे.
बाधित राहात असलेली खोली रोजच्या रोज सॅनिटाइज करणे.
बाधिताचे बाथरूम, टॉयलेट पूर्णपणे वेगळे ठेवणे; ते ही जंतुनाशक टाकून रोज स्वच्छ करणे.
घरात बाधिताचा वावर मर्यादित ठेवणे; अन्य कोणात मिसळू न देणे; लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींपासून लांब राहणे.
घरातील व्यक्तींनीही कायम मास्क वापरणे.
बाधिताकडून निर्माण झालेला कचरा वेगळी ठेवून, त्याची माहिती कचरा वेचकांना देणे.
टीव्हीचा रिमोट, मोबाइल, घरातील कॉमन वापराच्या वस्तू यांना बाधितांनी हात लावू नये.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना असे लक्षात आले, की एखाद्या सोसायटी किंवा इमारतीमध्ये एखादेच कुटुंब असते की, जे बाधित असते. त्यामुळे त्या इमारतीला स्टिकरिंग करणे, अन्य लोकांना अलर्ट करणे, बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना समजण्यासाठी छोटासा बॅनर लावणे हे केले जाते. गेल्या काही दिवसांत कुटुंब बाधित असण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.
– डॉ. कल्पना बळीवंत, सहायक आरोग्य प्रमुख, मनपा