-विनोद मोहिते
इस्लामपूर (प्रतिनिधी) – जिल्हाबंदी असतानाही “त्या” नगरसेवकाला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास चक्क कोकरूड पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी अवधूत इंगवले याने मदत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे.
दरम्यान, २८ एप्रिल पासून नगरसेवक खंडेराव जाधव फरारी होता. त्याला रविवारी अटक झाली. फरारी काळात जाधव व पोलीस इंगवले याचे कनेक्शन समोर आले होते. त्याच्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वॉच ठेवला होता. इंगवले याच्या हालचाली वर पोलीस लक्ष ठेवून होते.
मुख्याधिकार्यांना शिवीगाळ व दमदाटी प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीचा नगरसेवक खंडेराव जाधव याला आज रविवारी पहाटे आंबा घाटातील एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या फार्म हाउसवरून ताब्यात घेण्यात आले.
कोकरूड चेकपोस्ट वरून त्याला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास इंगवले यांनी मदत केली होती. एका चार चाकीतून जाणारे हे माझे नातेवाईक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील नातेवाईकांचे निधन झाले आहे. त्यांना सोडा असे इंगवले याने आपल्या सहकाऱ्यांना सांगून जाधव याला सांगली जिल्ह्याच्या सीमेपलीकडे पाठवण्यात यश मिळवले होते. तुरुकवाडी पोलीस चेक नाक्यावर इतर पोलिसाना याचा कोणताही संशय आला नाही. यामुळे जाधव याचे काम इंगवले याच्या मदतीने फत्ते झाले.
सहा मे रोजी जाधव याने कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर प्रवेश केला आणि आंबा येथील फार्म हाउसवर लपून बसला होता. गेल्या बारा दिवसांपासून खंडेराव जाधव फरारी होता. पोलिसांना जाधवला अटक करण्याचे आव्हान होते. अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर ही जाधव पोलिसाना चकवा देत होता. पोलीस कर्मचारी इंगवले हा पोलिसांच्या सर्व हालचालीची माहिती जाधव याला देत होता. तर जाधव याचे सर्व जवळचे मित्र, नातेवाईक पोलिसांनी चौकशीसाठी बोलावत होते.
या दरम्यान, काही जण तो इथे असेल.. तिथे असेल असे सांगत पोलिसांची दिशाभूल ही करत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली आहे.यामुळे पोलीस पथकांची चांगलीच दमछाक झाली होती. आपल्या स्वकीयांचे आव्हान पेलावे लागणार असल्याची चर्चा पोलीस अधिकाऱ्यांच्यात होती. ती अखेर खरी ठरली.
इंगवले पोलीस कर्मचारी यापूर्वी २०११-१२ साली नगरसेवक खंडेराव जाधव याचा अंगरक्षक होता. जाधव याने त्यावेळी शासनाकडे पैसे भरून सुरक्षेच्या कारणास्तव अंगरक्षक घेतला होता. त्यावेळी वर्षभर इंगवले याला जाधव याचा सहवास होता. यातून त्या दोघांची मैत्री वाढत गेली होती. या मैत्रीतून इंगवले याने जाधव याला मदत केली आणि अंगलट आली.
इंगवलेच्या निलंबनाचा प्रस्ताव…
फरारी असलेल्या जाधववर गुन्हे दाखल आहेत हे माहित असूनही त्याला मदत करणाऱ्या पोलीस कॉन्टेबल अवधूत इंगवले याला सोमवारी न्यायालयात हजर करणार असल्याचे आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना इंगवलेच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवला असल्याचे पोलीस उपाअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.
दरम्यान , जिल्हाबंदी आदेशाचा भंग करून कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केल्याबद्दल जाधव याच्यावर वर कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.