वाघोली (प्रतिनिधी) : खाजगी लॅबमध्ये केलेल्या कोरोना टेस्ट रिपोर्टमध्ये केसनंद येथील ४८ वर्षीय व्यक्ती पॉजिटीव्ह सापडली आहे. केसनंदमध्ये पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून पॉजिटीव्ह व्यक्तीला पुढील उपचारासाठी पुणे शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
केसनंदमध्ये पॉजिटीव्ह सापडलेली व्यक्ती वाघोलीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका संस्थेमध्ये काम करीत आहे. येथील दोघांची खाजगी लॅबमध्ये कोरोना टेस्ट करण्यात आली होती. एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह तर केसनंद येथील दुसऱ्याचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
औषध फवारणी करून सर्व दुकाने बंद ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना रिपोर्ट येईपर्यंत घरातच क्वारंटाइन राहण्याच्या सूचना करण्यात आल्या असून गावामध्ये सर्व्हे केला जात आहे. खबरदारी घेण्याचे काम प्रशासनाकडून केले जात असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव यांनी सांगितले आहे.