- स्थायी ची मंजुरी
- करोनाशी लढताना झाला होता मृत्यू
पिंपरी – करोना काळामध्ये मृत्यू पावलेल्या 13 महापालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेकडून प्रत्येकी 25 लाख रुपये सुरक्षा कवच योजनेअंतर्गत अदा करण्यात येणार आहे. याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आला. याबरोबरच या वारसांना पालिका सेवेत नोकरीत घेतले जाणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीच सभा आज महापालिकेमध्ये पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी ऍड. नितीन लांडगे होते. करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेकामी कार्यरत असलेल्या महापालिकेच्या 23 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. त्यामध्ये त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा विषय मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. अखेर यातील 13 कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा योजनेनुसार 25 लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनंत काळबांटे, हनुमंत वाडेकर, मारुती शेडगे (मजूर), शोभा भुजबळ (स्टाफ नर्स), ज्ञानेशर जाधव (वॉर्ड बॉय), भालचंद्र राऊत (एमपीडब्लू), मोहम्मद शेख (लिफ्टमन), सिध्दार्थ जगताप (उपलेखापाल), तानाजी धुमाळ, तायप्पा बहिरवाडे (रखवालदार), संभाजी पवार (शिपाई), अनिल ठाकूर (क्लिनर), साईनाथ लाखे (कार्यालयीन अधिक्षक) यांचा समावेश आहे. यांच्या वारसांना विमा रक्कम दिली जाणार आहे. उर्वरित 10 कर्मचाऱ्यांच्या वारसांना देखील विमा रक्कम देण्याचे प्रस्तावित आहे.
या खर्चासह महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकन आणि ऐनवेळच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणाऱ्या एकूण 18 कोटी 68 लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.