बोधेगाव – शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकाच्या पेरणीला वेग आला आहे.
बोधेगाव परिसरातील बोधेगाव, लाड जळगाव, सुकळी, गोलेगाव आदी गावात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पेरणीसाठी चांगलेच पोषक वातावरण तयार झाले आहे. मागील पंधरवड्यात म्हणजेच रोहिणी नक्षत्रात तालुक्यात काही स्वरूपात पाऊस सरी झाल्या.
या पावसावरच शेतकऱ्यांनी कपाशी लावण्याचा वेग धरला. अनेक शेतकऱ्यांची कपाशी लागवड आणि बाजरी, सोयाबीन, तूर पेरणीसाठी धावपळ सुरू आहे. दोन तीन दिवसांपासून पावसाच्या सरीवर सरी कोसळल्याने पिकांना चांगलाच आधार मिळाला आहे.
शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा
बोधेगावसह परिसरात मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. मात्र काही भागास अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. शेतकऱ्यांना पेरणीची उगवण आणि वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. सोमवार (दि.15) दुपारच्या सुमारास तालुक्यात झालेल्या पावसाने कपाशी, तुर खरीप पेरणीला जिवनदान मिळाले आहे.