नगर – खासदार डॉ. सुजय विखे पाटील व्यवसायाने डॉक्टर आहेत. तसेच त्यांचा यापूर्वीचा राजकीय कार्यकाळ राहाता, शिर्डी व कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गेला. त्यामुळे त्यांना नगरच्या महापालिकेतील “नॉलेज’ नाही, अशी खिल्ली भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष तथा पक्षाचे महापालिकेतील नगरसेवक महेंद्र गंधे यांनी आज उडविली.
भाजपतर्फे संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याची माहिती देण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज महापालिकेत पत्रकार परिषद बोलाविली होती. त्या पत्रकार परिषदेत गंधे यांनी थेट खासदारांवरच केलेली टीका चर्चेचा विषय ठरली. महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, मनोज कोतकर, पल्लवी जाधव, लता शेळके, अजय चितळे, पंकज जहागीरदार, वसंत राठोड, सतीश शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. गंधे यांच्या टीकेमुळे पक्षाचे नगरसेवक खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर थेट नाराज असल्याचे स्पष्ट झाले.
पत्रकारांशी बोलून गेल्यानंतर गंभीर स्टेटमेंट दिले गेल्याचे लक्षात आल्याने गंधे यांनी पुन्हा सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. डॉ. विखे पाटील व भाजप नगरसेवकांची दोन-तीन वेळा बैठक घेण्यात आली. त्यांना महापालिकेतील समस्यांविषयी माहितीही देण्यात आलेली आहे. त्यानंतरच खासदारांनी महापालिकेतील समस्यांवर एक दीर्घ बैठकही घेतली असल्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न गंधे यांनी केला.
तीस हजार लोकांपर्यंत पोहोचले संपर्क अभियान
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त शहरात भाजपने कुटुंब संपर्क अभियान राबविले. या अभियानाची माहिती भाजप शहर जिल्हाध्यक्षांनी महापालिकेत पत्रकारांना दिली. भाजप नेते व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊनच यापुढे काम चालेल, असे ते म्हणाले. नगर शहरातील भाजप नेते व कार्यकर्त्यांनी 30 हजार कुटुंबांपर्यंत कुटुंब संपर्क अभियान पोहचविले, असल्याचे ते म्हणाले.