पुणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा ढेपाळली

करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता असतानाही संशयितांच्या तपासणी संख्येत वाढ नाही

पुणे – करोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात असताना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढेपाळली आहे. मागील पंधरा दिवसांत चारशेच्या जवळपास सापडणारी बाधित संख्या एक हजारापर्यंत पोहोचली, तरी संशयितांच्या तपासणीची संख्या वाढलेली नाही. सर्वेक्षण थांबलेले आहे. त्यामुळे तत्काळ यंत्रणा प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी सदस्यांनी स्थायी समिती बैठकीत केली.

जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखली स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, आरोग्य विभागाचे उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नांदापुरकर, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, सदस्य शरद बुट्टेपाटील, वीरधवल जगदाळे, दत्ता झुरूंगे, अंकुश आमले, आशा बुचके आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, अंगणवाड्यांचे प्रलंबित बांधकामे, आयुषमान भारत योजनेतील गैरप्रकार या सारख्या विषयावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील आणि वीरधवल जगदाळे यांनी करोना उपाययोजनांबाबतीत आरोग्य यंत्रणा थंड पडली असून, चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. एकीकडे प्रशासन दुसरी लाट येणार आहे, असे सांगते. मात्र, दुसरीकडे कोविड केअर सेंटर्स बंद आहेत. प्रतिबंध क्षेत्राबाबत नागरिकांना कुठलीच माहिती नसते.

एखादा रुग्ण आढळला तर त्याचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग होत नाही. त्याचा फटका आपल्यालाच बसणार आहे. या ढिसाळ कारभारामुळे प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्‍यक आहे. नमुने तपासणीची संख्या वाढवावी. त्यावर अध्यक्ष निर्मला पानसरे आणि उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी करोनाबाबतीत जागृती करत दोन हजारांवर होत असलेली चाचणी संख्या अडीच हजारांपर्यंत असावी, असा सूचना दिल्या. राज्य शासनाच्या नियमांचे पालन झाले पाहिजे.

रुग्णवाहिकेचे भिजत घोंगडे…
दोन महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या रुग्णवाहिकांचे काय? याबाबत गटनेते शरद बुट्टेपाटील यांनी विचारले असता, जिल्हा परिषद निधीत अडीच कोटी रुपयांची तरतूद आहे, असे उपाध्यक्ष यांनी सांगितले. तर जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणतात केवळ 25 लक्ष उपलब्ध आहेत. या दोघांचा मेळ लागत नाही तेच सीईओ यांनी सर्व रुग्णवाहिका सुरू असल्याचे सांगितले. त्यावर कोणाचा कोणाला मेळ नसल्याचे दिसून आले. त्यावर बुट्टेपाटील यांनी आक्रमक भूमिका घेत डिझेल आणि चालक याची व्यवस्था नसून, आरोग्य विभागाचे जिल्ह्यात लक्ष नसल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.