निगडी – रामनगर येथील परशुराम चौकाजवळून सांडपाणी वाहून नेहण्यासाठी नाला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून या नाल्याची साफसफाई केलेली नाही. बर्याच वेळा नाला तुंबत आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून न गेल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. परिणामी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील नाल्याची साफसफाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून उघड्यावर असलेल्या नाल्यांची वेळोवेळी साफसफाई करणे गरजेचे आहे. महापालिका पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी टेंडर काढते. दरवर्षी लाखो रुपये त्यावर खर्च करण्यात येत आहेत. परंतु शहरातील बहुतांश नाल्यांमध्ये झाडेझुडपे, गवत, कचरा, गाळ दिसून येत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी नाला तुंबत आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून न गेल्याने परिसरात दुर्गंधी येत आहे. त्यामुळे नाल्याच्या जवळून प्रवास करताना नागरिकांना नाकाला रुमाल बांधून प्रवास करण्याची वेळ आली आहे.
डासांची होतेय उत्पत्ती
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत डेंगी, मलेरिया आदींचे रुग्णसंख्या वाढली आहे. ती कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधून नागरिकांवर, अस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. परंतु महापालिकेच्याच अंतर्गत असणार्या नाल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत आहे. याकडे महापालिका कधी लक्ष देणार असा प्रश्न नागरिक करत आहेत. रामनगरमधील नाला तुंबत असल्याने पाणी साचून राहत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांची निर्मिती होत आहे.
स्वच्छतेचा केवळ संदेश
पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी महापालिका मागील काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. परंतु शहरातील बहुतांश नाल्यांमध्ये कचरा, प्लॅस्टिक, बॉटल, कचरा दिसून येत आहे. त्यामुळे नाल्यातील पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी नाला तुंबत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथील नाल्याची त्वरित साफसफाई करण्याची मागणी होत आहे.
रामनगरमधून वाहनारा नाला अनेक दिवसांपासून तुंबला आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांची निर्मिती होत आहे. परिणामी डेंगी, मलेरिया सृदश्य आजारांना नागरिकांना बळी पडावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथील नाल्याची साफसफाई करणे गरजेचे आहे.
– राहुल दातीर, रामनगर.