पवनानगर (नीलेश ठाकर) – जगभरातील तरुणाई हातात गुलाबाचं फूल घेऊन ‘व्हॅलेंटाइन डे’साठी सज्ज होताना दिसत आहे. पण तुम्हाला माहितेय का… या तरूणाईच्या हातातल्या बहुतांश गुलाब फुलांना मराठी मातीचा गंध आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमधील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, यूरोप आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठवले जात आहेत. याशिवाय मुंबई, दिल्ली, बेंगळूरु, कोलकाता आदी मोठ्या शहरात फुले जातील ती वेगळीच.
तसेच संपूर्ण जगभरातील तरूणाईंना उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाईन ‘डे’ अवघ्या आठवड्यावर येवून ठेपला आहे. या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी मैत्रीचे प्रतिक असलेल्या गुलाब फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या तयारीसाठी मावळातील गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे. मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असल्याने यावर्षी व्हॅलेंटाईन ‘डे’ ला मावळातून 25 ते 30 लाख फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तर स्थानिक बाजारपेठेत ४० ते ४५ लाख गुलाबांची निर्यात होणार आहे.
दर्जा उत्तम पण उत्पादनात घट
मावळातील फुल उत्पादक शेतकरी हे डिसेंबरच्या दुस-या आठवड्यापासून फुलांच्या झाडांची कटींग व बेंडींगला प्रारंभ करून चांगले उत्पन्न व दर्जासाठी अडीच महिन्यापासून दिवस-रात्र शेतात राबत आहे. 1 ते 7 फेब्रुवारी हा जागतिक बाजारपेठेत फुलांची निर्यातीचा कालावधी असतो. यावर्षी मावळातील गुलाबांच्या निर्यातीला 3 फेब्रुवारीला सुरूवात झाली. पोषक वातावरणामुळे दर्जाही उत्तम असला तरी थंडी कमी असल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे.
यंदा विदेशातील मागणीत घट
फुलांच्या दराची प्रतवारी हि लांबीनुसार ठरली जाते. स्थानिक व जागतिक बाजार पेठेत 50, 60 ते 60 सेंटीमीटरच्या फुलांना मोठी पसंती असते. यावर्षी विदेशात फुलांना मागणी घटली आहे. प्रतवारीनुसार जागतिक बाजारपेठेत सध्या एका फुलाला 13 ते 14 रूपये भाव मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फुलाचे दर 1 ते 2 रुपयांनी कमी झाले आहेत.
गुलाबाच्या या जातींना मागणी
मावळातील ‘डच फ्लॉवर’ प्रजातीतील लाल रंगाच्या टॉपसिक्रेट, बोरडेक्स, फॅशन, सामुराई, कप्परक्लास, ग्रीनगला, फस्टरेड, पिवळ्या रंगाच्या गोल्डस्ट्राईक, गुलाबी रंगाच्या रिव्हायव्हल,पॉईजन, ऑरेंज (नारंगी) रंगाच्या ट्रॉफीकल अमेजॉन, झाकिरा, पांढ-या रंगाच्या अविलॉंस, या फुलांना मोठी मागणी आहे.
या वर्षी नैसर्गिक फुलांच्या मागणीत तब्बल 30 टक्के घट झाली आहे. या मुळे फुल उत्पादक शेतकरी हवाल झाला आहे. तसेच कृत्रिम फुलांचा लग्नातील सजावटीमध्ये उपयोग होऊ लागल्याने गुलाब उत्पादक हवालदिल झाले आहेत. तसेच यंदा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लग्नाचे यंदा मुहूर्त नसल्यामुळे यामुळे हे शेतकऱ्यांचे नुकसान पहायला मिळाले आहे.
– मुकुंद ठाकर, अध्यक्ष पवना फुल उत्पादक संघ
देशाला परकीय चलन मिळवून देण्याचे काम फुल उत्पादक शेतकरी करत आहे. त्यामुळे शासनाने फुल उत्पादक शेतकऱ्यांना हा व्यवसाय वृद्दी साठी विशेष सहकार्य करावे.
– दिलीप काळे