- कर्जत वंचित बहुजन आघाडीची मागणी
कर्जत – लॉकडाऊनचा फटका बहुतांश व्यवसायाला बसला आहे. माथेरानमध्ये सुद्धा पर्यटन बंद असल्याने परिणामी पर्यटकांना पॉइंटवर फिरायला नेणाऱ्या घोडेस्वारांचाही चार महिन्यांपासून धंदा बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या घोडेस्वारांना पर्यटन सुरू होवोस्तर शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी कर्जत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे केली आहे.
कर्जत वंचित बहुजन आघाडीने याबाबत मुख्यमंत्रीकडे कर्जत तहसील कार्यालयामार्फत निवेदन देऊन केली आहे.
थंड हवेचे ठिकाण तसेच पर्यटन स्थळ म्हणून माथेरान हे प्रसिद्ध आहे. माथेरानमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे आकर्षण घोडेस्वारी. देशात 25 मार्चपासून करोना प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे देशभरातील अनेक पर्यटनस्थळे बंद झाली.
माथेरानमध्ये सुद्धा करोना, लॉकडाऊनमुळे पर्यटक माथेरानला येणे बंद झाले. त्यामुळे माथेरानमधील पर्यटनावर अवलंबून असलेले सर्व व्यवसाय बंद झाले आहेत. याचा सर्वात मोठा फटका घोडेवाल्यांना बसला आहे.
घोडेवाल्यांची कमाई बंद झाल्यामुळे कुटुंब चालवणे मुश्कील झाले आहे. त्यात घोड्यांना लागणारं खाद्य सुद्धा उपलब्ध करायचे आहे. यामुळे घोडेवाल्यांची परिस्थिती बिकट होऊन बसली आहे. तसेच त्यांच्यावर उपासमारीची परिस्थिती तयार झाली आहे. या संदर्भात कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, जिल्हा पदधिकारी सुनील गायकवाड, शहर सचिव लोकेश यादव उपस्थित होते.