मोरगाव – बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयातच वीज चोरीचा राजरोसपणे सपाटा सुरू केला आहे. लोणी भापकर येथे दिवसा ढवळ्या वीज वाहक तारांवर आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांचा सावळा प्रताप नुकताच उजेडात आला असून या वीज चोरांवर महावितरण कोणती कारवाई करणार? याकडे संपूर्ण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.
सर्वसामान्य जनतेने वीज वाहक तारांवर आकडे टाकून वीज चोरी करीत असल्याचे प्रकार ऐकिवात होते. अशी वीज चोरी पकडल्यानंतर अनेकांवर मोठा आर्थिक दंड आणि कारवाई झाल्याचे वास्तव आहे; परंतु लोणी भापकर येथील दोन कार्यालयात चार वर्षे आकडा टाकूनच चोरून वीज वापरली जात आहे. याविरुद्ध महावितरण कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.
महावितरणने वेळोवेळी सूचना देऊन पैसेच भरले जात नसल्याने दोन्ही कार्यालयाचे मिटर काढून टाकले आहेत. लोणी भापकर हे या परिसरातील आठ ते दहा गावांचे हे केंद्रस्थान असून सरकारी कार्यालयात वीजेशिवाय कुठलेच काम चालत नाही, त्यामुळे आधुनिक साधनासाठी महिन्याला शेकडो युनिटचा होणारा वापर हा कोणाच्या नावावर जातो असा सवाल उपस्थित होत असून या सावळा गोंधळाबाबत महावितरणही गप्प असल्याने ग्रामस्थ संभ्रमात आहेत.
सर्वांना समान मापदंड न दाखवता महावितरण या वीज चोरीसाठी सरकारी कार्यालयांवर मेहरबान झाली का? गेली चार वर्षे राजरोसपणे वीजपुरवठा चोरी केल्याचे बिल वसूल होणार का? या शासकीय वीज चोरीवर महावितरण कारवाईचे धाडस दाखवणार का, असा सवाल सर्वसामान्य ग्रामस्थ विचारू लागले आहेत.
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी
होत आहे.
दुजाभाव का?
सर्वसामान्य शेतकऱ्यांनी वीजवाहक तारांवर आकडा टाकून वीज चोरी केल्यास महावितरण कठोर कारवाईचा बडगा उघडते, मग शासकीय कार्यालयांनी हा प्रकार केल्यानंतर त्यांना अभय का मिळतो. त्यामुळे या प्रकारात विषमता न दाखवता योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य ग्राहक करीत आहेत.
लोणी भापकर येथील घटनेचे आजच माहिती मिळाली असून यापुढे चोरून वीजपुरवठा न वापरण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. याबाबत संपूर्ण चौकशीचे आदेश घेऊन योग्य ती पुढील कारवाई केली जाईल.
– दादासाहेब कांबळे, प्रांत अधिकारी बारामती
कुठल्याही शासकीय कार्यालयात वीजचोरी होत असल्यास ही बाब गंभीर स्वरूपाची आहे; परंतु लोणीभापकर येथील प्रत्यक्ष वस्तुस्थिती बाबत आमचे अधिकारी घटनास्थळी गेले आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती पुढील कारवाईला प्राधान्य देण्यात येईल.
– विवेक राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, बारामती