छावण्यांबाबत शासनाला उशिरा आले शहाणपण…

रविंद्र कदम

पशुधनाचा कोरम पूर्ण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी दुसऱ्या गावात नेली जनावरे

बैल गेला अन्‌ झोपा केला, असेच म्हणावे लागले…

मार्च, एप्रिल व मे महिन्यात दुष्काळाचे सावट मोठ्या प्रमाणात होते. या दिवसांत पशुधन वाचविणे हे शेतकऱ्यांपुढे मोठे आवाहन ठरले होते. त्यासाठी शासनाने चारा छावणीमधील जनावरांच्या संख्येची अट तेव्हाच शिथिल करायला पाहिजे होती. आता पावसाळा तोंडावर आल्याने शासनाने ही अट कमी केली. म्हणजेच बैल गेला अन्‌ झोपा केला, असेच म्हणावे लागले. प्रशासनाने जनसामान्यांच्या गरजेनुसार योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे. मग तो निर्णय कोणताही असो तो योग्यवेळी घेतला तरच त्याचा फायदा होतो असे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी म्हटले आहे.

नगर  -जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे प्रशासनाने पशुधन वाचविण्यासाठी जिल्ह्यात चारा छावण्या सुरू केल्या. परंतु या चारा छावण्या सुरू करण्यासाठी अनेक जाचक अटी लादण्यात आल्या. आता पावसाळा तोंडावर आल्याने, या छावण्यांच्या अटी शिथिल केल्या आहेत. नव्या निर्णयानुसार दीडशे जनावरे असतील, तर छावणी सुरू करता येणार आहे. मात्र यापूर्वी 250 जनावरांची संख्या होत नसल्याने अनेक गावे छावण्यांपासून वंचित राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांना शेजारील गावांतील छावण्यांत आपली जनावरे ठेवावी लागली. त्यामुळे निकश बदलाचे शासनाला उशिरा सुचलेले शहानपण असल्याची टीका छावणी चालकांमधून होत आहे.

दुष्काळी भागात आवश्‍यकतेनुसार जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत सरकारने 25 जानेवारी रोजी मान्यता दिली होती. जनावरांची छावणी सुरू करण्यासाठी अटी व शर्ती ठरवून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक गावांत छावणी चालविण्याकरीता कोणी लवकर पुढे येत नव्हते. तसेच छावणी सुरू करण्यासाठी कमीत कमी 250 जनावरे त्या छावणीमध्ये असावेत, असा नियम शासनाने काढला होता. त्यामुळे अनेक गावांत चारा छावण्या सुरू झाल्या. त्या बंदही झाल्या. कारण त्या चारा छावण्यामध्ये जनावरांचा कोरम पूर्ण झाला नाही. त्यामुळे छावण्या बंद झाल्या. ज्या गावामधील चारा छावण्या सुरू झाल्या नाही, त्या गावामधील शेतकऱ्यांना नाइलाजास्तव दुसऱ्या गावात जनावरे घेऊन जावा लागले. त्यामुळे त्यांनाही आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला.

आता मात्र पावसाळ्याच्या तोंडावर चारा छावणीमधील जाचक अट कमी करून छावणीतील जनावरांच्या संख्येची अट दीडशेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपणच म्हणण्याची वेळ आली आहे, असे छावणी चालकामधून बोलले जात आहे. जिल्ह्यातील नगर तालुक्‍यात 66 छावण्यांमध्ये 51 हजार 824 जनावरे आहेत, जामखेड तालुक्‍यात 69 छावण्यांमध्ये 47 हजार 919, पारनेर तालुक्‍यात 41 छावण्यांमध्ये 30 हजार 527, कर्जत तालुक्‍यात 97 छावण्यांमध्ये 60 हजार 917, पाथर्डी तालुक्‍यात 107 छावण्यांमध्ये 68 हजार 21, श्रीगोंदे तालुक्‍यात 56 छावण्यांमध्ये 33 हजार 846, शेवगाव तालुक्‍यात 64 छावण्यांमध्ये 38 हजार 546 व नेवासे तालुक्‍यात 1 छावणी सुरू असून, तेथे 414 जनावरे दाखल झाली आहेत. एकूण जिल्ह्यात 501 चारा छावण्या सुरू असून, त्यामध्ये 3 लाख 32 हजार 14 जनावरे दाखल झाली आहेत. या जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी, त्यांना छावणीमध्ये देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, यावर रोज 3 कोटी 7 लाख 67 हजार 265 रुपयांचा खर्च होत आहे.

जनावरांचा कोरम पूर्ण न झाल्याने छावणी झाली बंद

नगर तालुक्‍यातील जेऊर (बा) येथे चारा छावणी सुरू करण्यात आली होती. या चारा छावणीत सुरुवातील 150 ते 175 जनावरे दाखल झाली. तर काही जनावरांसाठी निवारा करण्यासाठी शेतकऱ्यांचा वेळ गेला. त्यामुळे 300 जनावरांचा कोरम पूर्ण झाला नाही. व छावणी तपासणीत छावणी बंद करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले. या जाचक अटीमुळे नाइलाजास्तव छावणी बंद करण्यात आली असल्याचे जेऊरचे सरपंच रोहिदास मगर यांनी सांगितले. तर ही अट त्यावेळेस शिथिल केली असती तर आज ही चारा छावणी सुरू असती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.