पुणे महापालिकेचा 5 ते 15 जून पर्यावरण सप्ताह

पुणे – यंदा 5 ते 15 जून या काळात महापालिकेतर्फे पर्यावरण सप्ताह साजरा केला जाणार असून व्याख्याने, प्रदर्शन, कार्यशाळा, प्रदर्शिनी, अल्पदरात रोपांची उपलब्धता या सगळ्या उपक्रमांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. महापौर मुक्‍ता टिळक यांनी सोमवारी याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

महापालिकेने यंदा पर्यावरण दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नागरिकांना या काळात सकाळी 9 ते दुपारी 1 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 5 या कालावधीत मैलापाणी शुद्धीकरण केंद्र पाहता येणार आहे. याशिवाय वृक्षारोपण, भूजल पातळीमध्ये वाढ करणे, ग्रीन बिल्डींग फुटप्रिंट नकाशाचे पब्लिकेशन, शनिवार वाडा ते फर्गसन रस्ता सायकल रॅली, ई-कचरा संकलन, प्लॅस्टिक कलेक्‍शन ड्राईव्ह, वृक्षदिंडी, पोस्टर प्रदर्शन, “शिवरायांचे पर्यावरण धोरण आणि सद्यस्थितीतील त्याची उपयुक्‍तता’ या विषयावर डॉ. अजित आपटे यांचे व्याख्यान, बीजगोळे तयार करणे आदी कार्यशाळा यांचा समावेश असणार आहे.

पर्यावरणाचा संदेश देणारी देहू ते पंढरपूर सायकल फेरी
पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए यांच्या वतीने देहू ते पंढरपूर सायकल फेरीचे आयोजन केले आहे. यामध्ये पाचशे ते सहाशे जणांनी सहभाग नोंदवला आहे. दोन दिवसांचा हा उपक्रम असून 22 जून रोजी सकाळी 4 वाजता त्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता हे सायकलस्वार पंढरपूरात पोहोचतील. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेथून निघून ते पुण्यात येतील. या सायकलफेरीमध्ये ऍब्युलन्स, जॅकेटस, बॅनर्स, आयकार्डस यांचे सहकार्य महापालिका करणार आहे. तसेच, या सायकलस्वारांजवळ बीजगोळे आणि बिया देण्यात येणार असून त्यांनी त्या रस्त्याच्या दुतर्फा टाकाव्यात अशी अपेक्षा आहे, असे महापौर म्हणाल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.