मुंबई: करोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणे करून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल. तसेच मृत्यूदर देखील झपाट्याने कमी होऊ शकेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यूदर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईसह विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांत टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहेत.
ठाकरे म्हणाले की, मृत्यूदर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट्य असले पाहिजे. त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत. तसेच त्या उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसूत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे.
मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहे. पण त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता, त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती. तरी आपण या भागात साथीला नियंत्रणात ठेवले.
टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले, वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे दिली जातात. याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. नको तिथे अनावश्यक औषधी देऊ नये. अडचण येईल तेव्हा तत्काळ आम्हाला संपर्क करा. डॉ. राहुल पंडित म्हणाले, ही विशेष औषधे महत्वाची नाहीत, तर रुग्णांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. ऑक्सिजन उपलब्ध ठेवणे खूप आवश्यक असल्याचे
त्यांनी सांगितले.