आयपीएलमध्ये राबवणार अभिनव संकल्पना
मुंबई – करोनाचा धोका कायम असताना आयपीएल स्पर्धा सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यंदाच्या स्पर्धेत एक अभिनव कल्पना राबविली जाणार आहे. प्रत्यक्ष समालोचन कक्षात उपस्थित न राहता प्रसिद्ध समालोचक आपापल्या घरातूनच समालोचन करणार आहेत.
या स्पर्धेचे ब्रॉडकास्टर्सकडून यंदाच्या स्पर्धेतील सामन्यांचे धावते समालोचन होणार असून त्यालाच व्हर्च्युअल कॉमेंट्री असे लेबल लावण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेत थ्री टीम क्रिकेटचा सामना नुकताच झाला त्यात हा प्रयोग करण्यात आला व त्याला यशही आले.
इतकेच नाही तर या सामन्याचे समालोचन भारताच्या इरफान पठाणने बडोद्यातील घरातून, दीप दासगुप्ताने कोलकातातून तर, संजय मांजरेकर यांनी मुंबईतून केले.
या सामन्याचे प्रक्षेपणाचे हक्क स्टार स्पोर्ट्सकडे होते. दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियन पार्कवर झालेल्या या सामन्याचे धावते समालोचन या समालोचकांनी आपापल्या घरातून केले. त्याच धर्तीवर आता यंदाच्या आयपीएलमधील सामन्यासाठीही हा प्रयोग राबवला जाण्याची शक्यता आहे.