दोन आठवड्यांत शहरात रुग्णांचा आकडा वाढला
पुणे – लॉकडाऊनच्या पहिल्या दोन महिन्यांत हाताच्या बोटावर मोजण्याइतकी रुग्ण संख्या असलेल्या शहरातील औंध-बाणेर, कोथरूड, वारजे-कर्वेनगर आणि सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मागील तीन आठवड्यांत रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. विशेषत: या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये करोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने ही साथ रोखण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.
शहरातील करोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्यावर गेला असून या चार क्षेत्रीय कार्यालयातील एकूण रुग्णसंख्या 1 हजार 62वर गेली आहे. त्यात सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात 534, कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 142 तर, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 90 आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 296 रुग्ण आहेत. याच चार क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत महिन्याभरापूर्वी 32 रूग्ण होते.
शहरात 9 मार्च रोजी करोनाचे पहिले दोन रुग्ण सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सापडले त्यानंतर शहरात देशव्यापी लॉकडाऊन जाहीर होईपर्यंत रुग्णांचा आकडा 30च्या आसपास होता. मात्र, 17 जून अखेर हा आकडा 10 हजार 300वर गेला आहे. त्यात सर्वाधिक 1772 रुग्ण ढोले-पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सापडले आहेत. तर त्या खालोखाल कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 1126 रुग्ण सापडले आहेत.
तर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 976 रुग्ण आहेत तर घोलेपाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सुमारे 862 रुग्ण आहेत. शहरात करोनाचे रुग्ण 1 एप्रिलपासून वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर या पाच क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतच सर्वाधिक रुग्ण होते. मात्र, 17 मे नंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर वानवडी-रामटेकडी कार्यालयाच्या हद्दीत 763, बिबवेवाडी क्षेत्रीय हद्दीत 617, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 450, धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 406 तर नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 398 रुग्ण सापडले आहेत.