पुणे – मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड ही शहरे जोडली गेली आहेत. तर, या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांनी स्वातंत्र्यदिनी नवा विक्रम केला. दि. 15 ऑगस्टच्या दिवसभरात तब्बल 1 लाख 23 हजार 720 प्रवाशांनी मेट्रोची सैर अनुभवली. त्यामुळे वाहतूक कोंडीमुक्त प्रवासाचा आनंद या नागरिकांना मिळाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी या मार्गांचे लोकार्पण करण्यात झाले. त्यानंतर महामेट्रोने दिवसात सर्वाधिक प्रवासी वहनाचा उच्चांक गाठला आहे. यापूर्वी दि. 6 ऑगस्ट रोजी 96 हजार 498 जणांनी मेट्रोतून एकाच दिवशी प्रवास केला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना जोडणारे रस्ते वाहतुकीसाठी अपुरे ठरत आहेत. तसेच जुन्या मुंबई-पुणे रस्ता रुंदीकरण सुरू आहेत. यामुळे नागरिकांना पीएमपी अथवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यास जवळपास एक ते दीड तासांचा वेळ जातो. मात्र, मेट्रोमुळे आता अवघे 20 ते 25 मिनिटेच लागत आहेत. दरम्यान, हा मार्ग नेमका कसा आहे, मेट्रोचे सिव्हिल कोर्ट स्टेशन कसे आहे, याबाबत पुणेकरांना उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे.
मार्ग आणि प्रवासी
सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड – 61,834
वनाज ते रुबीहॉल – 61,886
बिघाडाने 20 मिनिटे सेवा बंद
दरम्यान, दि. 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वनाज ते रुबी हॉल मार्गावरील सेवा वीज पुरवठा खंडित झाल्याने 20 मिनिटे बंद पडली होती. दरम्यान, महामेट्रोला महावितरणकडून (MSEDCL) नव्हे, तर महापारेषण (MSETCL) कडून 131 के.व्ही. दाबाचा वीजपुरवठा केला जातो. महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सोमवारी सायंकाळी पुणे मेट्रोकडून रेंजहिल्स अतिउच्चदाब केव्ही उपकेंद्रात वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी अंतर्गत वीज यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो सेवेचा वीजपुरवठा 20 मिनिटे बंद होता.’
आजपासून सकाळी सहा वाजता सेवा
मेट्रोच्या प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मेट्रोची सेवा दि. 17 ऑगस्टपासून सकाळी एक तास आधी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वनाज ते रुबी हॉल आणि सिव्हील कोर्ट ते पिंपरी-चिंचवड या मार्गांवर सकाळी सहा ते रात्री 10 वाजेपर्यंत मेट्रोची सेवा दिली जाणार आहे.