पाटण – प्रवासभत्ता बिल मंजूर करून देण्यासाठी झालेल्या रक्कमेवर पाच टक्के रक्कम लाच म्हणून स्वीकारताना एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका लिना साहेबराव साळुंखे (वय 41, रा. कराड, जि. सातारा) यांना 978 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, संबंधित तक्रारदार व आरोपी एकात्मिक बालविकास प्रकल्प या कार्यालयात काम करतात.
तक्रारदार यांचे सन 2016 पासूनचे प्रवासभत्ता बील 18 हजार 978 रुपये एवढे होते. या बिलावर पाच टक्के रक्कम 948 रुपयांची मागणी दि. 28 मे 2019 रोजी आरोपी लिना साळुंखे यांनी तक्रारदार यांचेकडे केली. त्यानुसार सोमवारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक शिर्के यांनी सापळा लावून आरोपी लिना साळुंखे यांना रंगेहात पकडले.
लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या सापळ्यात लिना साळुंखे आडकल्या. याबाबतची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांना दिली. त्यांनी तत्काळ सर्कीट हाऊस याठिकाणी जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी आरोपींना रडू कोसळले.
एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकारी असणाऱ्या वावरेमॅडम यांना हिला लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. मात्र या प्रकरणात त्यांचा संबंध आहे की नाही, हे शेवटपर्यंत समजू शकले नाही. मात्र चौकशी दरम्यान त्यांना अश्रू अनावर झाले होते. याबाबत पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांना विचारले असता त्यांनी त्यांचा दहा टक्के सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला.