सुपा (वार्ताहर) – नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपा टोलनाक्याजवळ मोटारसायकल व चारचाकीची धडक होवून मोटारसायकलस्वार ठार झाला. तसेच मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर चारचाकी वाहन घेवून चालक फरार झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. 5) रात्री पावणेआठच्या सुमारास झाला.
अपघातात आंतुश दशरथ चव्हाण (रा. न्हावरा, ता. शिरूर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात किशोर तुकाराम बर्डे (रा. पद्मपुरवाडी, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण सहकारी आंतुश दशरथ चव्हाण याच्यासह मोटारसायकलवरून (क्र. एमएच- 12 एमडी- 6002) शनिवारी नगरहून पुण्याच्या दिशेने जात होतो.
आम्ही महामार्गावरील सुपा टोलनाक्याजवळ आलो असता रात्री पावणेआठच्या सुमारास समोरून आलेल्या आज्ञात चारचाकी वाहनाने समोरून धडक दिली. त्यात दुचाकी चालवणारा माझा सहकारी अंतुश चव्हाण याचा मृत्यू झाला. तसेच मी ही गंभीर जखमी झालो. अपघातनंतर चारचाकी वाहनचालक तेथून वाहनासह पसार झाला.
सुपा पोलिसांनी फिर्यादी बर्डे यांच्या फिर्यादीवरुन चारचाकी वाहनावरील आज्ञात चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आपघाताची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी. सी. कोसे व पोलीस नाईक के. एस. शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत जखमीस उपचारासाठी रुग्णालयात हलविले. पुढील तपास सुपा पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आर. जे. साबळे हे करीत आहेत.
घातपाताचा संशय
दरम्यान या अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चारचाकी वाहनाने उलट दिशेने येवून दुचाकीला चिरडून चालक वाहनासह फरार झाल्याची चर्चा परिसरात आहे.