जुन्नर परिसरात वनविभागाने गस्त वाढविली

बिबट्यांच्या 5 बछड्यांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतर निर्णय

पुणे – शेत पेटवून दिल्याने बिबट्याच्या पाच बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. तसेच मानवी वस्तीत बिबट्यांकडून सातत्याने होणारे हल्ले अशा विविध घटनांच्या पार्श्‍वभूमीवर वनविभागाकडून जुन्नर परिसरात विशेष काळजी घेतली जात आहे. सध्या सुरू असलेल्या ऊसतोडणीचा हंगाम लक्षात घेता, वनविभागाने परिसरातील पेट्रोलिंग (गस्त) वाढविली आहे.

जिल्ह्यातील जुन्नर आणि शिरूर तालुक्‍यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणी होणाऱ्या ऊस शेतीमुळे बिबट्यांना हक्काचे आश्रयस्थान मिळते. बहुतांश ठिकाणी ऊसाच्या शेतात बिबट्यांनी आपले ठाण मांडले असून, ऊस तोडणी काळात हे बिबटे बाहेर पडून परिसरातील नागरिकांवर हल्ले करतात. इतकेच नव्हे, तर बिबट्यांची बछडीदेखील या शेतांमध्ये असल्याने दिवसेंदिवस परिसरातील मानव-बिबट्या संघर्षात वाढ होत आहे. तो कमी करण्यासाठी तसेच परिसरातील नागरिकांमधील भीती कमी करण्यासाठी जुन्नर परिसरात वनाधिकाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने याठिकाणी जनजागृती करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती वनविभागातर्फे महेश भावसार यांनी दिली आहे. संपूर्ण तयारीनिशी वनविभागाचे अधिकारी गस्त घालत असल्याने स्थानिक नागरिकांमधील चिंतेचे वातावरण कमी होण्यास मदत मिळते. तसेच वनाधिकाऱ्यांनादेखील परिसरातील परिस्थितीची अचूक माहिती समजण्यासाठी मोठी मदत मिळत असल्याने, गस्ती पथक उपयुक्त ठरत असल्याचेही भावसार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.