आर्म्सतर्फे वेस्टर्न घाट हिल क्‍लाईम्ब स्पर्धा

पुणे – असोसिएशन फॉर रेसिंग अँड मोटारस्पोर्टस (आर्म्स) तर्फे दुचाकी वाहनांकरिता 14 एप्रिल रोजी महाराष्ट्रातच वेस्टर्न घाट हिलक्‍लाईम्ब स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मांढरदेव घाटात होणार आहे.

आर्म्सचे अध्यक्ष कमलेश दवे यांनी ही माहिती दिली. या स्पर्धेसाठी वेगवेगळे दहा गट ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी कानाकोपऱ्यातून ऐंशी स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्यामध्ये पिंकेश ठक्कर, लोकेश भोसले, नीरज वांजळे, दिनेश हेगडे (शेट्टी) या नामवंत खेळाडूंबरोबरच परदेशी वाहन गटातील संभाव्य विजेता बादल जोशी याचाही समावेश आहे. ज्येष्ठ खेळाडूंसाठी असलेल्या विशेष गटांत रफीक मामा, श्रीकांत लक्ष्मीश्वर यांच्यात विजेतेपदाची लढत अपेक्षित आहे. महिलांमध्येही रंगतदार शर्यत पाहावयास मिळणार आहे.

चौदा एप्रिल रोजी सकाळी 9-30 वाजता वाजता मांढरदेव घाटाच्या पायथ्यापासून या स्पर्धेस प्रारंभ होईल. हा घाट सात किलोमीटर अंतराचा असून प्रत्येक मिनिटाला एक स्पर्धक सोडला जाणार असून सर्वात कमी वेळ नोंदविणाऱ्यास विजेता घोषित केले जाईल. मांढरदेव घाटातील अवघड वळणे लक्षात घेता प्रत्येक स्पर्धकाचे कौशल्य पणास लागणार आहे. स्थानिक प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा आकर्षण ठरणार आहे.

ही स्पर्धा जी.एम.केंजळे कन्स्ट्रक्‍शन्स व वीर बाजी पासलकर प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयोजित केली आहे. स्पर्धेतील दहा गटातील विजेत्यांना त्यांच्यातर्फे आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. आर्म्सतर्फे यापूर्वी आयोजित केलेल्या अखिल भारतीय खुल्या डर्ट ट्रॅक स्पर्धेस स्पर्धक व प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा मिळाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.