पुणे – करोनामुळे शैक्षणिक सत्राचे नियोजन कोलमडले आहे. अशा परिस्थितीत शैक्षणिक वेळापत्रक पूर्वनियोजित होण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम व द्वितीय सत्राची परीक्षा एकत्र घ्यावी, अशी मागणी अधिसभा सदस्यांकडून होत आहे. असे झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल, असेही त्यांचे म्हणणे आहे.
अधिसभा सदस्य डॉ. पंकज मणियार यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे ही मागणी केली. पुणे विद्यापीठाने 15 मार्चपासून परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. जवळपास दीड महिना ही परीक्षा चालणार आहे. त्यामुळे द्वितीय सत्र तेवढ्या कालावधीपर्यंत लांबणार आहे. द्वितीय सत्र सुरू होण्यासाठी मे उजाडणार आहे.
पण विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 31 मे रोजी शैक्षणिक वर्ष संपणार आहे. त्यानंतर उन्हाळी सुट्टी द्यावी लागेल. याचा विचार करता द्वितीय सत्र पुन्हा तीन ते चार महिन्यांनी संपणार आहे. म्हणजेच दिवाळीपर्यंत द्वितीय सत्राचे कामकाज संपेल. त्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने प्रथम सत्र परीक्षेसाठी दीड महिना देण्यापेक्षा त्वरित द्वितीय सत्राचे वर्ग सुरू करावेत. त्यानंतर हा अभ्यासक्रम एप्रिल-मे महिन्यात संपण्यास पुढील दीड महिना परीक्षा घेता येईल. त्यामुळे 2021-22 चे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करता येईल, अशी मागणी मणियार यांनी केली आहे.
अधिसभेतही उपस्थित झाला होता मुद्दा
मणियार यांनी जानेवारीमध्ये झालेल्या अधिसभेतदेखील दोन्ही सत्राच्या परीक्षा एकत्र घ्याव्या, असा ठराव मांडला होता. यामध्ये प्रश्नपत्रिकेत प्रथम वर्षासाठी सेक्शन एक व द्वितीय सत्रासाठी सेक्शन दोन असे विभाग करून परीक्षा घेता येणे शक्य आहे, असे सांगितले होते. मात्र, त्यावेळी याकडे लक्ष दिले नव्हते.