‘आयुष्मान सीएपीएफ’: देशभरातील सर्व रुग्णालयांत मिळणार जवानांना मोफत उपाचार

केंद्रीय सुरक्षा दल जवान, कुटुंबीयांसाठी भारत सरकारकडून आरोग्य योजना

पुणे – केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी-जवान आणि त्यांचे कुटुंबीय यांना आता देशातील कोणत्याही रुग्नालयात मोफत उपचार घेता येणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे “आयुष्मान सीएपीएफ’ ही योजना मेपासून भारतभर लागू होणार आहे. यांतर्गत जवान आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या उपचारासाठी रुग्णालयाच्या बिलाची काळजी भारत सरकार घेणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालय आणि नॅशनल हेल्थ अथॉरिटी यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू केली आहे. त्याला 23 जानेवारी रोजी प्रारंभ झाला. मात्र, सुरुवातीला केवळ आसाममध्ये प्रायोगिक प्रकल्प म्हणून ही योजना सुरू केली होती. मात्र, आता देशभर ती लागू होणार आहे.

केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासंदर्भातील डेटाबेस तयार करण्याचे काम सुरू आहे. तो राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाला पुरविला जाईल. जो आयुष्मान भारत योजनेंतर्गत सर्व रुग्णालयांशी जोडला जाईल. त्यामुळे भारतभरातील डॉक्‍टर या डेटाबेसमधील माहिती आणि सीएपीएफचा तपशील तपासू शकतात.

प्रत्येकास ओळख म्हणून एक कार्ड दिले जाईल. याद्वारे देशात कोठेही खासगी, निमसरकारी, सरकारी रुग्णालयांत मोफत उपचार घेता येणार आहे. विशेष म्हणजे बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) उपचारांचा खर्चदेखील यामध्ये सामाविष्ट असेल. या व्यतिरिक्‍त चोविस तास कॉल सेंटर, ऑनलाइन तक्रार व्यवस्थापन प्रणाली, फसवणूक आणि दुरुपयोग नियंत्रण प्रणाली आणि रिअल टाइम मॉनिटरिंग डॅसबोर्ड ही असणार आहे.

सात दलांतील जवानांना मिळणार फायदा
आसाम रायफल्स, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), सशस्त्र सीमा दल (एसएसबी), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड (एनएसजी) आणि इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना या योजनेत समाविष्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.