मुंबई – महाविकास आघाडीची मुलुखमैदान तोफ, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची प्रॉपर्टी ईडीने जप्त केल्याची बातमी येत आहे. काय चालले आहे? महाराष्ट्रात हे सुडाचे राजकारण सुरु आहे. 2019 साली राज्यात सरकार स्थापन न करु शकलेला भाजप सुडाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या बलस्थानांना टप्प्याटप्प्याने टार्गेट करण्याचे काम करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.
संजय राऊत सातत्याने महाविकास आघाडीची बाजू मांडत असताना भाजपच्या विरोधात बोलत होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राऊत यांचे राहते घरही जप्त करण्यात आले आहे. कालच ईडी संदर्भात राऊत यांनी तक्रार दिली होती. त्यासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसआयटी स्थापन करुन संबंधित ईडी अधिकाऱ्याची चौकशी होणार, अशी माहिती दिली. त्यानंतर लगेचच राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाली, असे तपासे म्हणाले.
याचा अर्थ स्पष्ट आहे. ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात सुडाची कारवाई करुन त्यांची बदनामी करण्याचे काम भाजप करत आहे. ही गोष्ट लोकशाहीच्या दृष्टीकोनातून अयोग्य असल्याची टीका तपासे यांनी केली.