लक्षद्विप – वेगाने खालावत चाललेली हवेची गुणवत्ता जगभरात चिंतेचे कारण बनत आहे. भारतात तर परिस्थिती आणखी वाईट आहे. हवामान शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञ हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजनांवर सातत्याने काम करत आहेत. त्याचवेळी केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमध्ये प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला आहे. येथील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक आठवड्यातील बुधवारी ‘सायकल डे’ म्हणून पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हा आदेश 6 एप्रिलपासून लागू होणार आहे.
केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप प्रशासनाच्या आदेशानुसार, 6 एप्रिलपासून राज्यात दर बुधवारी सायकल दिन साजरा केला जाणार आहे. दर बुधवारी सर्व सरकारी कर्मचारी सायकलने त्यांच्या कार्यालयात येतील, असेही या आदेशात म्हटले आहे. लक्षद्वीप प्रशासनाने यासंदर्भात एक प्रसिद्धी पत्रकही जारी केले आहे.
लक्षद्वीप प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 28 जानेवारी 2022 रोजी झालेल्या 13 व्या लक्षद्वीप प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बैठकीत दिलेल्या सूचनांच्या आधारे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या आदेशातून केवळ अपंग आणि आजारी सरकारी कर्मचाऱ्यांना सूट देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, नुकतेच यूएन पर्यावरण संरक्षण एजन्सीने जगभरातील देशांचे हवेच्या गुणवत्तेचे रँकिंग जारी केले आहे. 50 पैकी 35 निकृष्ट दर्जाची शहरे भारतातील असल्याचे नोंदवले गेले.