बारामती – शहरातील पहिला करोना रुग्ण असलेला रिक्षाचालक करोना’मुक्त झाला आहे. तसेच इतर पाच जणांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी स्पष्ट केले आहे.
बारामती शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सात आहे. त्यापैकी रिक्षाचालकास घरी सोडण्यात आले आहे, तर 75 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याच्याच कुटुंबातील चौघांसह एकूण पाच जणांवर सध्या उपाचर सुरू असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. बारामती शहरात रिक्षाचालकाला करोनाची लागण झाल्याचे दि. 29 मार्च रोजी निष्पन्न झाले होते.
तेव्हापासून या रुग्णावर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्बल 18 दिवसांनंतर या रुग्णाच्या तीनही तपासण्या निगेटिव्ह आल्याने सोमवारी त्यास घरी सोडण्यात आले असले तरी खबरदारीचे उपाय म्हणून 14 दिवस होम क्वारंटाइन ठेवण्यात आल्याचे डॉ. काळे यांनी स्पष्ट केले.
तरी नियमांचे पालन करणे गरजेचे
बारामती शहरात “भिलवाडा’ तसेच “बारामती पॅटर्न’ प्रभावीपणे राबवल्याने व नागरिकांनीही त्यास दिलेल्या प्रतिसादामुळे शहरातील करोना परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणाखाली आली असली तरी संकट अद्याप टळलेले नसल्याने शासनाने आखून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले तर बारामतीपूर्णपणे “करोना’मुक्त होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.