करोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध
पुणे – करोनाग्रस्त रुग्णांकरिता ससून रुग्णालय हे क्रिटिकल केअर सेंटर असून बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 31 मार्च रोजी ससूनमध्ये पहिला करोनाचे बाधित रुग्ण दाखल झाला होता, आतापर्यंत एकूण 82 रुग्ण दाखल झाले असल्याची माहिती ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.
ससून रुग्णालय हे अतिविशेष उपचारांसाठीचे रुग्णालय असल्याने येथे सर्व गंभीर आणि अत्यवस्थ रुग्ण दाखल केले जातात. जे रुग्ण स्थिर आहेत, अशांना इतर रुग्णालयात उदा: नायडू रुग्णालय येथे ठेवले जाते.
दरम्यान, नायडू रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेसाठी ससून रुग्णालयातील तज्ज्ञ आणि निवासी डॉक्टर दि.11 मार्चपासून 24 तास उपचार देत आहेत. नायडू रुग्णालयातील गंभीर रुग्णांना ससून रुग्णालयात संदर्भित केले जाते, अशा रुग्णांची काळजी घेण्यासाठी 24 तास निवासी डॉक्टरांसोबत वरिष्ठ प्राध्यापक देखील कार्यरत असल्याचे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले. करोनाबाधित रुग्णांवरील उपचार पध्दती ही महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, आयसीएमआर यांनी आखून दिलेल्या उपचार पध्दतीप्रमाणे केली जात असून डॉक्टर्स, कर्मचारी यात अहोरात्र कार्यरत आहेत. रुग्णांना सुरुवातीला ससून रुग्णालयातील डेव्हीड ससून रुग्णालय इमारतीत उपचार करण्यात येत होते. आता, नवीन अकरा मजली इमारतीमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
सुसज्ज, आधुनिक विभाग…
13 एप्रिल 2020 पासून करोनाबाधित रुग्णांना नवीन 11 मजली इमारतीत 100 खाटांचा विलगीकरण कक्ष व 50 खाटांचा अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला आहे. या रुग्णांवर तेथे तातडीने उपचार करण्यात येत आहेत. या इमारतीत सर्व अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहेत. रुग्णांसाठी आवश्यक असे 21 व्हेंटिलेटर्स सध्या कार्यरत असून पुढे गरज भासल्यास ही संख्या 50 ते 150 पर्यंत वाढविण्याची क्षमता आहे. या नवीन 11 मजली इमारतीत ससून रुग्णालयासोबत खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तज्ज्ञांना देखील करोनाबाधित रुग्णांवरील उपचार करण्यासाठी सामावून घेण्यात आले आहेत. या रुग्णांवरील उपचारासाठी लागणारे इतर तज्ज्ञ उदा-हृदयरोगतज्ज्ञ, मूत्रपिंड आजार तज्ज्ञ, मेंदू रोग आजार तज्ज्ञ हे ससून रुग्णालयात उपलब्ध असून 24 तास या रुग्णांसाठी उपचार करीत आहेत. तसेच करोना संशयित रुग्णांसाठी “फ्लू ओपीडी” नवीन 11 मजली इमारतीत दि. 20 मार्चपासून स्वतंत्रपणे सुरू करण्यात आली असल्याचे डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.
तज्ज्ञ डॉक्टर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांचा फौजफाटा…
ससून सर्वोपचार रुग्णालयात दि.21 मार्चपासून कोविड-19 आजारासंदर्भातील तपासणी आयसीएमआर आणि एनआयव्ही यांच्या मान्यतेने सुरू करण्यात आलेली आहे. आजपर्यंत येथे 1233 तपासण्या करण्यात आल्या असून पुण्याबरोबरच सातारा, नगर व नाशिक या जिल्ह्यातील करोना संशयित रुग्णांच्या तपासण्याही करण्यात येत आहेत. तसेच या रुग्णालयात करोनाच्या संशयित व बाधित रुग्णांवरील सर्व उपचार येथील यंत्रणेमार्फत करण्यात येत असून यासाठी सर्वोपचार रुग्णालयातील अंदाजे 31 वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर्स, 70 निवासी डॉक्टर्स, 76 परिचारिका व आरोग्य कर्मचारी 24 तास कार्यरत आहेत, असे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.
रुग्णांनी अंगावर आजार काढू नये. त्रास होत असेल तर त्वरित उपचार घेणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही अफवा किंवा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करून ससून रुग्णालय करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास सदैव तयार व सक्षम आहे.
– डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय