सातारा -करोनाबाधित पत्रकारांचे “होम आयसोलेशन’ करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकाराने साताऱ्याजवळ यवतेश्वर येथील हॉटेल निवांत येथे पत्रकारांसाठी करोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. पत्रकारांनी पत्रकारांसाठी उभे केलेले राज्यातील हे पहिले करोना केअर सेंटर (आयसोलेशन सेंटर) आहे.
सातारा जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या 31 हजारांच्या पुढे तर मृतां संख्या 900 च्या पुढे गेली आहे. फिल्डवर व कार्यालयात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत; परंतु पत्रकार बाधित झाल्यानंतर होम आयसोलेशनची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते.
सातारा जिल्हा पत्रकार संघाने त्यावर तोडगा काढत हॉटेल निवांत येथे 16 बेडचे दोन ऑक्सिजन मशीनयुक्त करोना केअर सेंटर सुरू करण्याचा संकल्प सोडला. ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब जाधव व चंद्रसेन जाधव यांनी उदार मनाने आपल्या हॉटेलमधील खोल्या या केंद्रासाठी देऊ केल्या.
जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने या करोना केअर सेंटरचा सोमवारी प्रारंभ झाला. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सुजित आंबेकर, चंद्रसेन जाधव, दीपक दीक्षित, चंद्रकांत देवरुखकर, प्रशांत जाधव, राहुल तपासे, ओंकार कदम, तुषार तपासे, तबरेज बागवान, प्रमोद इंगळे, सिद्धार्थ लाटकर, रणजित नलावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दादासाहेब पवार, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासनाच्या सूचनेनुसार या सेंटरची नियमावली करण्यात आली आहे. साताऱ्यातील ज्या बाधित पत्रकारांकडे गृह विलगीकरणाची सोय नाही, त्यांच्यासाठीच ही व्यवस्था आहे. खा. उदयनराजे भोसले व उद्योजक सागर भोसले यांनी या सेंटरसाठी दोन ऑक्सिजन मशिन दिली आहेत. आरोग्य विभागामार्फत एक डॉक्टर व दोन नर्स वैद्यकीय सेवा देणार आहेत. या सेंटरमध्ये दोन वेळचे जेवण व नाश्ता, होम आयसोलेशन किट उपलब्ध आहे.
ज्यांची पत्रकार, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे रिपोर्टर म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाकडे अधिकृत नोंद आहे, त्यांनाच या सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ज्या बाधित पत्रकाराची ऑक्सिजन लेव्हल (ओ2) 94 पेक्षा अधिक आहे, त्यांनाच या केंद्रात ठेवले जाणार आहे.
आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी करुनच प्रवेश मिळेल. एकदा प्रवेश दिल्यानंतर दहा दिवस बाहेर पडता येणार नाही. बाहेर फिरल्याचे निदर्शनास आल्यास पुन्हा प्रवेश मिळणार नाही. या केंद्रावर डॉक्टर व त्यांचे सहाय्यक उपस्थित राहणार आहेत. या केंद्रात येताना दहा दिवसांसाठी लागणारे कपडे, नियमित घेत असलेली औषधे व अन्य आवश्यक वस्तू बरोबर आणाव्यात. या केंद्रात व्यसन करण्यास सक्त मनाई आहे. हे उपचार केंद्र नसून गृह विलगीकरणाची सोय नसलेल्या पत्रकारांसाठीच ही व्यवस्था आहे.