अखेरच्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारीने खेळावे – विराट कोहली

रविंद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याच्या खेळीने समाधानी

लंडन: विश्‍वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना न्युझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरी केल्याने भारताला हा सामना एकतर्फी गमवावा लागल्याने भारतीय संघावर टिका होत असुन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघातील तळाच्या फळीतील फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

न्युझीलंड विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन तर, विराट कोहली हे आघाडीचे फलंदाज न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात झटपट माघारी परतले. चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेला लोकेश राहुललाही फारशी चमक दाखवता आली नाही. भारताकडून मधल्या फळीत हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांनी थोडीफार झुंज दिली. त्यामुळे तरी भारतीय संघाने 179 धावांचे मजल मारली.

या विषयी बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, विश्‍वचषकासारख्या स्पर्धेत कधीकधी तुमचे सुरुवातीच्या फळीतले फलंदाज हे अपयशी ठरतात. अशावेळी तळातल्या खेळाडूंनी फलंदाजीची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. पहिल्या सराव सामन्यात आम्ही ठरवलेल्या गोष्टी मैदानात घडून आल्याच नाहीत. मात्र मधल्या फळीत हार्दिक, जाडेजा, धोनीने काही धावा काढल्या ही आमच्यासाठी सकारात्मक बाब आहे. 4/50 या धावसंख्येवरुन 179 पर्यंत मजल मारणे ही माझ्यासाठी आश्‍वासक बाब आहे. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने आपले मत मांडले.

दरम्यान, रविंद्र जाडेजाचा (54) अपवाद वगळता भारताच्या अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. जाडेजाच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला 179 धावांचा टप्पा गाठता आला. अर्धशतकी खेळीत जाडेजाने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. कर्णधार विराट कोहलीसह सलमीवीर रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल स्वस्तात बाद झाले.

हार्दिक पांडयाने (30) थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. एम एस धोनी (17) आणि दिनेश कार्तिक (4) फारशी चमक दाखवू शकले नाहीत. पांडया आणि कार्तिकला नीशामने तर धोनीला साऊदीने बाद केले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बाऊल्टने भेदक मारा करत रोहित (2), शिखर (2) आणि राहुलला (6) स्वस्तात बाद केले होते.

यावेळी गोलंदाजांबाबत बोलताना कोहली म्हणाला की, आजच्या सामन्यात आमच्या फिरकी गोलंदाजांना खेळपट्टी कडून कोणतीही मदत मिळाली नाही. मात्र, अमच्या वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत मिळत होती. त्याचा फायदा आमच्या गोलंदाजांना बऱ्या पैकी झाला. मात्र, फिरकी गोलंदाजांना आपल्या शैलीत बदल करावा लागेल. आशा आहे की पुढच्या सामन्यात आमच्या संघातील फिरकी गोलंदाज चांगली कामगिरी करुन संघाला विजय मिळवून देतील.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.