उच्च न्यायालयाच्या आदेशाने दिलासा
अग्निशमन दल कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 58 करण्याचे होते आदेश
पुणे – अग्निशमन दलातील तांडेल पदावरील तीन कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वरून 58 करून त्यांना सेवानिवृत्त करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे, अशी माहिती पुणे महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी दिली आहे. या निर्णयामुळे पालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराला चाप बसल्याची टीकाही कॉ. भट यांनी केली आहे.
महापालिकेच्या सर्व खात्यातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. अग्निशमन दलातील तांडेल हे पदही 2014 पूर्वीच्या सरळ सेवा प्रवेश नियमावलीनुसार चतुर्थ श्रेणीत गणले जाते. मात्र, महापालिका प्रशासनाने मनमानी पद्धतीने तांडेल पदावरील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 58 करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, या पदावर कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना 58 व्या वर्षीच सक्तीने सेवानिवृत्तीची पत्रे दिली.
त्यानंतर महापालिकेच्या कामगार युनियनने 2014 च्या सरळ सेवा प्रवेश नियमावलीबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हा दावा प्रलंबित असतानाच महापालिकेने तीन कर्मचाऱ्यांवर ही नियमावली लादल्याचा दावा करत युनियनने यासंदर्भात उच्च न्यायालयात 16 एप्रिल 2019 रोजी अर्ज (रिट) दाखल केला. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने महापालिकेच्या तांडेल पदावर कार्यरत तीन कर्मचार्यांच्या सेवानिवृत्तीच्या निर्णयास अंतरिम स्थगितीचे आदेश दिल्याचे कॉ. भट यांनी सांगितले आहे.