जहांगिर रुग्णालयातील डॉक्टरांनी केले समुपदेशन
पुणे – अपघातात गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यावेळी जहांगिर रुग्णालयातील डॉक्टरांनी अवयवदानाबाबत नातेवाईकांचे समुपदेशन केल्यामुळे तीन व्यक्तींना जीवनदान मिळाले आहे. यावेळी ब्रेनडेड व्यक्तीचे लिव्हर (यकृत) नाशिकला पाठविण्यात आले तर दोन किडनी पुण्यातील रुग्णांना देण्यात आल्या.
शंकर शेठ रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी जहांगिर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला जबर मार लागल्यामुळे डॉक्टरांच्या चमूने सर्व तपासण्या करून तत्काळ मेंदूवर शस्त्रक्रिया केली. मात्र, रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्यामुळे डॉक्टरांनी “ब्रेनडेड’ घोषित केले. त्यानंतर डॉक्टरांनी ब्रेनडेड व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेऊन अवयवदान करण्याबाबत समुपदेशन केले. नातेवाईकांनीही त्याला संमती दिल्यावर यकृत नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलला पाठविण्यात आले.
त्याठिकाणी 32 वर्षीय मुलावर युकृत प्रत्यारोपण करण्यात आले. जहांगिर रुग्णालयातील 56 वर्षीय रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण केले आणि दुसरे दीनानाथ रूग्णालयातील 50 वर्षांच्या रुग्णाला देण्यात आले. त्यासाठी डॉ. अभय सोमानी, डॉ. सचिन वझे, श्रीनिवास अंबिके, डॉ. योगेश सोहोनी, डॉ. किरीपेकर याच्यासह सदस्यांनी समुपदेशन केले.