पणजी – सर्वसमावेशकता हे सुवर्णमहोत्सवी इफ्फीचे वैशिष्ट्य आहे. इफ्फीमध्ये ‘सुगम्य भारत-सुगम्य चित्रपट’ विभागात विशेष गरजा असलेल्यांसाठी तीन चित्रपटांचा समावेश आहे. इफ्फी आणि युनेस्कोच्या सहकार्याने, दिल्लीतील सक्षम ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था नेत्रहीन आणि दृष्टीवर परिणाम झालेल्या व्यक्तींचा सक्षमीकरणासाठी काम करत आहे.
केवळ इमारती सुगम्य होणे पुरेसे नाही तर मनोरंजनाचे सर्वोत्तम माध्यम असलेले चित्रपटही दिव्यांग व्यक्तींना सुगम्य झाले पाहिजेत, असे मत सक्षम फाऊंडेशनचे संस्थापक दीपेंद्र मनोचा यांनी केले. इफ्फीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चित्रपट सर्वांपर्यंत पोहोचले तर आपणही समाजाचा भाग असल्याची अनुभूती दिव्यांग व्यक्तींना मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.
इफ्फीमध्ये अनेक बदल होत आहेत. ऑडिओ डिस्क्रीप्शन्स असलेले चित्रपट समाविष्ट करण्याचा निर्णय हा याचाच भाग असल्याचे गोवा सरकारच्या सामाजिक कल्याण संचालनालयातील विशेष कार्य अधिकारी तहा हाझिक यांनी सांगितले.
इतर देशांच्या तुलनेत भारतात ॲनिमेशन चित्रपटांना सरकारकडून पुरेसा निधी मिळत नसल्याची खंत ‘बॉम्बे रोज’ या ॲनिमेशनपटाच्या दिग्दर्शक गीतांजली राव यांनी व्यक्त केली. तसेच ॲनिमेशनपट प्रदर्शनासाठी योग्य मंच उपलब्ध होण्याची, दूरचित्रवाणी क्षेत्राकडून सहाय्य मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.